Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

हरियाणाच्या (Haryana) पंचकुला (Panchkula) येथील सेक्टर 27 मध्ये 26 मे 2025 रोजी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली. या ठिकाणी देहरादून (Dehradun) येथील एका कुटुंबातील सात जणांनी विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केली. या कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह एका बंद कारमध्ये सापडले. यासोबत मिळालेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीत प्रचंड आर्थिक कर्ज आणि दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा उल्लेख आहे. मृतांमध्ये 42 वर्षीय प्रवीण मित्तल, त्यांचे आई-वडील, पत्नी आणि तीन मुले- दोन मुली आणि एक मुलगा, यांचा समावेश आहे. हे कुटुंब पंचकुला येथील बागेश्वर धाम येथे आयोजित पाच दिवसीय हनुमान कथा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते आणि देहरादूनला परतत असताना त्यांनी हा निर्णय घेतला.

या घटनेबाबत परिसरात आणि सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले जात असून, आर्थिक संकट आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. अहवालानुसार, हे कुटुंब देहरादून येथील रहिवासी असून, त्यांचा टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय होता, ज्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे कुटुंब रविवारी, 25 मे 2025 रोजी, बागेश्वर धाम येथील धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर देहरादूनला परतत होते. सेक्टर 27 मधील एका निवासी परिसरात त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे स्थानिकांनी रात्री 10:30 च्या सुमारास पाहिले.

स्थानिक रहिवासी पुनीत यांनी सांगितले की, कारमधील फक्त एकच व्यक्ती श्वास घेत होती, तर इतर बेशुद्ध असल्याचे दिसून आले. जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले, तेव्हा ती व्यक्ती, म्हणजेच प्रवीण यांनी पुनीतला सांगितले की, त्यांनी विष प्रश्न केले आहे व ते पाच मिनिटांत मरण पावतील. यावेळी त्यांनी आपल्यावर असलेल्या कर्जामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचेही नमूद केले. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी कुटुंबातील सातही सदस्यांना जवळच्या ओजस हॉस्पिटल आणि सेक्टर 6 मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सर्वांना मृत घोषित केले. पोलिसांना कारमधून एक आत्महत्येची चिठ्ठी मिळाली, ज्यामध्ये कुटुंबप्रमुख प्रवीन मित्तल यांनी कर्जाचा प्रचंड दबाव आणि आर्थिक संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे नमूद केले आहे. पंचकुला पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक आणि कायदा व सुव्यवस्था उपायुक्त अमित दहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष)

कौशिक यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना आहे असे दिसते, परंतु फॉरेन्सिक तज्ज्ञ कार आणि इतर पुराव्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करत आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन पंचकुला येथील एका खासगी रुग्णालयात करण्यात येत आहे, आणि चिठ्ठीच्या सत्यतेची पडताळणी सुरू आहे. तपासात कुटुंबाच्या व्यवसायातील तोटा आणि कर्जाची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे त्यांनी दहा वर्षांपूर्वी पंचकुलाहून देहरादूनला स्थलांतर केले होते.

(Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers:

Tele Manas (Ministry of Health)- 14416 or 1800 891 4416, NIMHANS- + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400, Peak Mind- 080-456 87786, Vandrevala Foundation- 9999 666 555, Arpita Suicide Prevention Helpline- 080-23655557, iCALL- 022-25521111 and 9152987821, COOJ Mental Health Foundation (COOJ)- 0832-2252525.)