भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेली 'मकर संक्रांत' यंदा १४ जानेवारी २०२६ रोजी साजरी होत आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, मात्र महिलांसाठी या सणाचे आकर्षण असते ते म्हणजे 'हळदी-कुंकू'. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात सुवासिनी एकमेकींना घरी बोलावून वाण लुटतात आणि तिळगूळ देतात. या सोहळ्यात आपली संस्कृती जपत उखाणे घेण्याची एक वेगळीच परंपरा आहे.
हळदी-कुंकू आणि वाण लुटण्याचे महत्त्व
मकर संक्रांतीला हळदी-कुंकू लावणे हे केवळ धार्मिक कार्य नसून तो एक सामाजिक मेळावा आहे. या दिवशी स्त्रिया एकमेकींना सौभाग्यवाण देतात. यामध्ये पूर्वी मातीची सुघटी दिली जात असे, आताच्या काळात गृहोपयोगी वस्तू किंवा सौंदर्यप्रसाधने देण्याची पद्धत रूढ झाली आहे. 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत एकमेकींमधील नाते अधिक घट्ट करण्याचा हा प्रयत्न असतो.
कार्यक्रमाची रंगत वाढवणारे निवडक मराठी उखाणे
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात नाव घेण्याचा आग्रह झाला की अनेकदा सुचत नाही. अशा वेळी खालील उखाणे महिलांसाठी उपयुक्त ठरतील:
तिळगुळाच्या डब्यात साखरेचा खडा, ... रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण मोठा.

काळ्या मखमली चंद्रकळेवर शोभते जरीचे काम, ... रावांचे नाव घेते देऊन हळदी-कुंकवाचे मान.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, ... रावांचे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी.

संसार रुपी सागरात प्रेमाची लाट, ... रावांच्या साथीने चालते माझी जीवनाची वाट.

संक्रांतीला काळी साडी नेसण्याची परंपरा
मकर संक्रांत हा वर्षाचा पहिला सण असतो आणि तो थंडीच्या दिवसात येतो. काळा रंग उष्णता शोषून घेतो, त्यामुळे शरीरात उबदारपणा टिकून राहावा या शास्त्रीय कारणास्तव संक्रांतीला काळी साडी नेसण्याची परंपरा आहे. या दिवशी नवविवाहित वधूचा 'हलव्याचे दागिने' घालून पहिला संक्रांत सण साजरा केला जातो, ज्याला 'बोरन्हाण' असेही म्हणतात.