मुंबई: हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत सुवासिनींच्या घरी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा १४ जानेवारी २०२६ रोजी मकर संक्रांत साजरी होत असून, त्यानंतर महिनाभर हे समारंभ चालतील. आपल्या घरी सखी-सोबतींना बोलावण्यासाठी निमंत्रण देणे ही या सोहळ्यातील पहिली आणि महत्त्वाची पायरी असते. काळानुसार निमंत्रण देण्याच्या पद्धतीत बदल झाला असून, आता पारंपारिक पत्रिकांसोबतच 'डिजिटल निमंत्रण' (Digital Invitations) मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत.
निमंत्रण पत्रिकेचे पारंपारिक नमुने
हळदी-कुंकवाचे निमंत्रण देताना त्यामध्ये आदर आणि जिव्हाळा असणे आवश्यक आहे. जर तुम्ही लिखित स्वरूपात किंवा व्हॉट्सॲपवर निमंत्रण पाठवणार असाल, तर खालील नमुने वापरू शकता:
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि..... रोजी .... वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...

हळदी-कुंकू समारंभाचे महत्त्व
हळदी-कुंकू हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो सामाजिक एकोपा वाढवण्याचा एक मार्ग आहे. एकमेकींना वाण देणे, सुख-दु:खाच्या गोष्टी करणे आणि नातेसंबंध दृढ करणे हा यामागचा उद्देश असतो. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींसाठी पहिले हळदी-कुंकू आणि लहान मुलांसाठी 'बोरन्हाण' याचे नियोजनही याच काळात केले जाते.