मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून (Gwalior) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिचा पती नपुंसक (Eunuch) असून तो तृतीयपंथी लोकांसोबत वावरतो. लग्नाला 4 वर्षे झाली तरी तिच्या पतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. कालांतराने तिचा पती मुलींसारखे कपडे घालून कार्यक्रमात नाचत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने पतीचा मोबाईल तपासला असता, मोबाईलमध्ये सापडलेल्या फोटोंवरून तो ट्रान्सजेन्डर लोकांसोबत फिरत असल्याचेही समोर आले. यानंतर तिने पतीला समजावले, मात्र पती तिचे ऐकायला तयार नव्हता.
याबाबत महिलेने सासरच्या लोकांकडे तक्रार केली असता त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पत्नीला आता पतीपासून घटस्फोट घ्यायचा आहे. पोलीस आता हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पाठवणार आहेत.
अहवालानुसार, ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने महिला पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. तिने सांगितले की 2020 मध्ये तिचे लग्न ग्वाल्हेरच्या एका कुटुंबात झाले होते. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबीयांना 12 लाख रुपये किमतीचे दागिने आणि घरातील सर्व सामान दिले होते. लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरच्या घरी आली तेव्हा पतीने सांगितले की, तो सध्या शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण होऊ शकले नाहीत.
पतीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन ती त्याच्यापासून वेगळे झोपू लागली. तिने पुढे सांगितले की, लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या लोकांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद सुरू झाला. या वादात तिला अनेकवेळा मारहाणही झाली. तिने याचा विरोध केला असता तिच्या पतीनेही तिला मारहाण केली. एक दिवस ती बाजारात गेली असता तिने तिच्या पतीला बाजारात इतर तृतीयपंथी लोकांसोबत पकडले. तिने पाहिले की, महिलेच्या वेशात असलेला तिचा नवरा घरांमध्ये पैसे मागत आहे. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने हे प्रकरण टाळले आणि हा कार्यक्रमाचा भाग असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: Rape and Breakup Case: केवळ ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही; Supreme Court चा मोठा निर्णय)
महिलेने घरी येऊन सासू-सासरे व इतर लोकांशी याबाबत चर्चा केली. महिलेने पतीला हे काम सोडण्यास सांगितले असता तिला मारहाण करण्यात आली. पुढे महिला आजारी पडल्यावर तिच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडले. यानंतर सासरच्यांनी तिच्याकडे दोन लाख रुपये आणि स्कूटरची मागणी केली. अखेर छळाला कंटाळून महिलेने पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, या वादात दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पण, पती पत्नीसोबत राहण्यास तयार नाही, त्यामुळे पत्नीला आता घटस्फोट घ्यायचा आहे. आता हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात पाठवण्यात येणार आहे.