गुजरात: 'डोकं मोठं आहे हेल्मेट पुरत नाही'; दुचाकी स्वाराचा दावा ऐकून पोलिसांनी केला दंड माफ, वाचा सविस्तर
Zakir Mamon (Photo Credits: Twitter @iammajidalam)

अहमदाबाद: देशात नवा मोटार वाहन कायदा (Motor Vehicle Act) लागू झाल्यावर सर्वत्र दंडाची रक्कम हा चर्चेचा विषय ठरला आहे. आतापर्यंत याच अंतर्गत नियमाचे पालन न केल्याने लाखोंचा भुर्दंड बसल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. पण गुजरात (Gujrat) मधील छोटा उदयपूर (Chota Udaipur) या परिसरात नुकताच घडलेला किस्सा ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.. झालं असं की, झाकीर मेमन (Jhakir Memon) नामक एक इसम आपले दुचाकीवरून जात होता, यावेळी त्याने हेल्मेट (Helmet) घातले नव्हते. साहजिकच त्याला ट्राफिक पोलिसांनी पकडले आणि मोटार वाहतूक कायद्याच्या अंतर्गत दंडाची मागणी केली, पण यावर झाकीरने आपले डोके हे इतरांपेक्षा मोठे असल्याचे म्हणत सोबत आणलेले हेल्मेट घालून याचे प्रात्यक्षिकही दाखवले. आश्चर्य म्हणजे झाकीरने केलेला दावा हा सोदाहरण खरा ठरल्याने पोलिसांना काही न बोलता त्याचे म्हणणे ऐकावे लागले.

झाकीर मेमन हे छोटा उदयपूर येथील बोडोली शहराचे रहिवाशी आहेत. पोलिसांनी विना हेल्मेट पकडल्यावर झाकीर यांनी आपले डोके हे आकाराने मोठे आहे, त्यामुळे आपल्या मापाचे कोणतेच हेल्मेट मार्केटमध्ये उपलब्ध नसल्याने इच्छा असतानाही आपल्याला हेल्मेट वापरणे शक्य होत नाही असे सांगितले. याआधी हेल्मेटच्या शोधार्थ आपण अनेक दुकानाच्या फेऱ्या मारल्या पण कुठेच आपल्या मापाचे हेल्मेट सापडले नाही त्यामुळे आता नेहमीच विना हेल्मेट गाडी चालवावी लागते असेही ते म्हणाले. असे असले तरी गाडीशी संबधीत सर्व महत्वाचे कागदपत्रे झाकीर नेहमी सोबत बाळगतात.

दिल्ली: नशेच्या अवस्थेत गाडी चालवणाऱ्या तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी आकारला भला मोठा दंड; तरुणाने चिडून बाईकच पेटवली (Watch Video)

दरम्यान, याबाबत वाहतूक पोलीस उपनिरीक्षक वसंत राठवा यांनी झाकीर यांची समस्या खरोखरच वेगळी असल्याचे सांगत त्यांच्याकडे आवश्यक सर्व दस्तऐवजही आहेत त्यामुळे त्यांचा दंड माफ केल्याची माहिती दिली.