दिल्ली: नशेच्या अवस्थेत गाडी चालवणाऱ्या तरुणाला ट्रॅफिक पोलिसांनी आकारला भला मोठा दंड; तरुणाने चिडून बाईकच पेटवली (Watch Video)
Delhi Man Sets Bike on Fire. (Photo Credits: ANI)

रस्ते वाहतूक सुरक्षेत वाढ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारतर्फे 1  सप्टेंबर रोजी नव्या मोटार वाहतूक कायद्यातील (Motor Vehicle Amendment Act) 63 तरतुदी लागू करण्यात आल्या. ज्यानुसार यापुढे वाहतुकीच्या नियमाचा भंग झाल्यास हजारो रुपयांचे दंड आकारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत एक विचित्र प्रसंग घडल्याचे समजत आहे.  झालं असं की, नशेच्या अवस्थेत बाईक चालवणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आणि नियमानुसार त्याला दंड भरण्यास सांगितले. वास्तविक अशावेळी लोकांना तुम्ही पोलिसांकडे गयावया करताना किंवा जास्तीत जास्त भांडताना पाहिले असेल पण या तरुणाने पोलिसांचा राग आपल्याच बाईकवर काढत भररस्त्यात चक्क बाईकला आग लावली.

ANI ट्विट

प्राप्त माहितीनुसार, राकेश नामक या तरुणाला वाहतूक पोलिसांनी चिराग दिल्ली येथील शेख सराय परिसरात नशेच्या अवस्थेत गाडी चालवताना पकडले होते. यानंतर पोलिसांनी त्याला 23 हजाराचा दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगत त्याची बाईक जप्त करायला घेतली पण तितक्यात राकेशने त्याच्या बाईकच्या तेलाच्या टाकीला आग लावली. भर रस्त्यात गाडीने पेट घेतल्यावर पोलिसही गांगरून गेले. इतक्यात अग्निशमन दलाच्या छोट्या गाडीने या आगीला पाणी टाकून विझवले.(खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर, होईल 25,000 रुपये दंड, 3 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या New Traffic Rules in India 2019)

पहा हा व्हिडीओ

दरम्यान, यापूर्वी देखील असाच काहीसा प्रकार समोर आला होता. एका रिक्षाचालकाकडून नियमच भंग झाल्यामुळे त्याला रिसेच्या मुद्दल भावापेक्षा दुप्पटीने दंड आकारण्यात आला होता. या घटनांमुळे काही ठिकाणहून या नवीन कायद्याला विरोध दर्शवण्यात येत असला तरी हा निर्णय नागरिकांच्या भल्याचा विचार करूनच घेण्यात आला आहे यामुळे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर रोख बसेल असे केंद्रीय वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते.