Bathing. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

चंदीगडपाठोपाठ आता गुजरातमध्येही (Gujarat) विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण गुजरातमधील वलसाड (Valsad) जिल्ह्यातील धरमपूर येथील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींचे अश्लील फोटो तसेच व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. पालकांनी वसतिगृहाच्या कुकबाबत पोलिसांकडे तक्रार केली, त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. विद्यार्थिनींनी सांगितले की, मुलींच्या वसतिगृहाचा स्वयंपाकी बाथरूमच्या तुटलेल्या खिडकीतून त्यांचा व्हिडिओ बनवतो आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो.

वलसाड जिल्ह्यातील धरमपूर येथील करचोड गावात साक्षरता मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांना विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची माहिती मिळताच त्यांनी वसतिगृह गाठून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. जिल्हा पोलिसांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुलींनी स्वयंपाकीवर विनयभंग आणि छेडछाड केल्याचा आरोपही केला आहे.

वलसाड हा आदिवासी बहुल जिल्हा असून या वसतिगृहात गरीब व मागास आदिवासी कुटुंबातील मुली शिक्षण घेतात. नुकतेच चंदीगड वसतिगृहातील मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आल्यानंतर, येथील विद्यार्थिनींनीही त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती शेअर केली. यानंतर पालकांनी त्याबाबत संताप व्यक्त केला आणि पोलिसांकडून चौकशीची मागणी केली. मुलींच्या वसतिगृहात पुरुष स्वयंपाकी ठेवण्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, स्थानिक उपनिरीक्षक आणि उपजिल्हाधिकारी करत आहेत. वलसाड जिल्ह्या पोलीस अधीक्षक राजदीप सिंग झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीही अशा कृत्यामध्ये सहभागी असल्याचे आढळल्यास, त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींनी या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक किंवा पोलिसांना त्यांच्या लेखी अर्जात व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो काढल्याचा उल्लेख केलेला नाही. (हेही वाचा: Suicide: शिक्षकाच्या छळाला कंटाळून सातवीतील विद्यार्थ्याची पंख्याला गळफास लावून आत्महत्या)

या वसतिगृहात चार पुरुष स्वयंपाकी आहेत व त्यातील केवळ एका स्वयंपाकीकडे अँड्रॉइड फोन असून, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चौधरी यांनी सांगितले की, प्राथमिक तक्रार जेवणाच्या निकृष्ट दर्जाची होती.