![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/07/Baby.jpg?width=380&height=214)
गुजरातमधील (Gujarat) सुरेंद्रनगर (Surendranagar) जिल्ह्यातून एका कुटुंबाने कौटुंबिक प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्या तीन दिवसांच्या नातीला जिवंत गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घनघडा येथील हरिपार गावात ही घटना घडली. मात्र, दैव बलवत्तर म्हणून हे अर्भक चमत्कारिकरित्या वाचले. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. दोन मेंढपाळांना गुरे चारत असताना, जमिनीत गाडलेली लहान मुलगी दिसली. या मुलाचे केवळ तोंड जमिनीवर दिसत होते. तिच्या शरीराचा उर्वरित भाग पूर्णपणे गाडला गेला होता. हे दृश्य पाहून मेंढपाळांना धक्काच बसला.
त्यानंतर त्यांनी ताबडतोब स्थानिक समुदायाला सूचना दिली, त्यांनी ताबडतोब बाळाला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मुलीचा बचाव केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी जवळपासच्या गावात शोध घेतला. स्थानिकांशी बोलल्यावर, पोलिसांना नुकतीच प्रसूती झालेल्या बाळाच्या आईची माहिती मिळाली.
आज तकच्या वृत्तानुसार, पोलिसांच्या चौकशीत असे दिसून आले की, नवजात बाळाच्या आजी-आजोबांनी आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधातून जन्मलेल्या या बाळाला लपवण्यासाठी तिला जिवंत पुरले होते. सामाजिक विरोध आणि कौटुंबिक सन्मान गमावण्याच्या भीतीने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मुलीचे शरीर जमिनीत गाडले गेले व तिला श्वास घेता यावा म्हणून तोंड तेव्हढे उघडे ठेवले. मुलीला मृत्यूची शक्यता असलेल्या परिस्थितीत तसेच सोडण्यात आले होते. (हेही वाचा: Karnataka: इंजेक्शनच्या ओव्हरडोजमुळे सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल)
आता या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे आजी-आजोबा आणि त्यांना मदत करणाऱ्या एका व्यक्तीसह तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, बाळाच्या आईची प्रकृती खालावल्याने तिला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. बाळाच्या आईला बाळाला दफन करण्याच्या योजनेची माहिती होती, असे अहवालात म्हटले आहे. तिची प्रकृती सुधारल्यानंतर पोलीस तिच्यावर पुढील कारवाई करतील. बाळाला जवळच्या निरीक्षणाखाली सरकारी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळत आहे.