अबब! तब्बल 6 फुट लांब केसांचा विश्वविक्रम; भारताच्या निलांशी पटेलचे नाव Guinness World Records मध्ये सामील
Nilanshi Patel Sets Guinness World Record (Photo Credits: Screengrab/ YouTube)

लांब केस (Long Hair) कोणाला आवडत नाहीत? प्रत्येक स्त्री लांब केसांची अपेक्षा ठेवते परंतु प्रत्येकाला ते भाग्य लाभते असे नाही. गुजरात (Gujrat) राज्यातील मोडासा येथील ब्रिज पटेल यांची मुलगी निलांशी पटेल (Nilanshi Patel), सध्या 12 वीत शिकत आहे. आता तिने पुन्हा एकदा आपल्या, 190 सेमी लांब केसांसह विश्वविक्रम केला आहे. गिनीज वर्ल्ड बुकमध्ये (Guinness World Records) याची नोंद झाली आहे.

तिने याधीचा विक्रम 21 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीच्या रोममध्ये केला होता. 170.5 सेमी लांब केसांसह हा जागतिक विक्रम नोंदवला गेला होता. आता स्वत: चा विक्रम मोडत निलांशी पटेल हिने 2019 मध्ये पुन्हा एकदा लांब केसांचा विश्वविक्रम केला आहे. 190 सेमी लांब केस असलेली भारतातील पहिली महिला आहे.

निलांशीने तीन वर्षांची असल्यापासून आपले केस वाढवायला सुरुवात केली होती. आपली आई कामिनीबेनच्या मदतीने निलांशीने ही किमया करून दाखवली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदवणार्‍या निलंशीचे वय अवघे 17 वर्षे आहे. सहा वर्षांची असताना निलांशीचे केस अगदी बारीक कापण्यात आले होते, त्यानंतर निलांशीने कधीही आपले केस कापले नाहीत.

याबाबत बोलताना निलांशीची आई म्हणते, ‘या केसांसाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. निलांशीच्या केसांना जास्त केमिकलयुक्त पदार्थ लावले जात नाहीत. तसेच केस न गाळण्यासाठी आठवड्यातून एकदाच केस धुतले जातात. केसांची तेल मालिश ही नियमित केली जाते.’ तर अशा लांब केसांचे कारण म्हणजे निलांशिची आई आणि वडिलांचे जीन्स होय.