गुजरात (Gujarat) सरकारने 26 जिल्ह्यांमधील 46 आमदारांना जिल्हा पोलिस तक्रार प्राधिकरण सदस्य (Police Complaints Authority) म्हणून नियुक्त केले आहे. हे प्राधिकरण गुजरात पोलिस अधिनियम 2007 अन्वये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केले जाईल. जिल्हा पोलिस तक्रार केंद्रात नियुक्त केलेल्या आमदारांमध्ये सर्वाधिक धक्कादायक नाव राष्ट्रवादीचे आमदार कंधाल जडेजा (NCP MLA Kandhal Jadeja) यांचे आहे. कंधाल जडेजा हे पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना येथील आमदार आहेत. कंधाल जडेजा ‘गॉडमदर’ या नावाने लोकप्रिय असलेल्या संतोखबेन जडेजा यांचा मुलगा आहे. महत्वाचे म्हणजे कंधाल जडेजा यांच्यावर तब्बल 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अशाप्रकारे इतके गुन्हे दाखल असलेल्या कंधाल जडेजा यांना पोरबंदर जिल्हा पोलिस तक्रार केंद्राचा सदस्य करण्यात आला आहे. त्यांच्यासमवेत, भाजपचे आमदार आणि गुजरात सरकारचे माजी मंत्री बाबू बोखिरिया यांचेही नाव आहे. कंधाल जडेजा यांच्यावर बंदुक ताणणे, गोळीबार करणे, स्फोटके बाळगणे, खंडणी, प्राणघातक हल्ला, खोटेपणा आणि कायद्याच्या कचाट्यातून पळून जाने असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कंधाल जडेजा हे 1994 पासून गुन्हेगारीच्या जगात सक्रिय होते. 1994 मध्ये जडेजावर बेकायदा शस्त्रे बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. (हेही वाचा: प्रशांत भूषण न्यायालय अवमान प्रकरणात कोर्टाने निर्णय राखून ठेवाल; 5 ठळक मुद्दे)
जिल्हा पोलिस तक्रार केंद्र हे एक व्यासपीठ आहे जिथे कोणतीही व्यक्ती जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक पदापर्यंतच्या कोणत्याही पोलिसाची तक्रार करू शकते. गुजरात सरकारने 19 ऑगस्ट रोजी आमदारांच्या या नेमणुका केल्या. नियुक्त केलेल्या आमदारांमध्ये विरोधी कॉंग्रेसचेही तीन आमदार आहेत. यामध्ये जामनगरचे आमदार विक्रम मॅडम, गिर सोमनाथचे आमदार विमल चौदसामा आणि जुनागडचे आमदार भागभाई बारड यांचा समावेश आहे. दरम्यान, कंधाल जडेजावर दाखल झालेल्या प्रकरणांपैकी 3 गुन्हे मारधाड आणि दंगली भडकवल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आले आहेत. 15 प्रकरणांपैकी पोरबंदर जिल्ह्यात 10, राजकोटमध्ये तीन आणि अहमदाबाद शहरात दोन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.