Monkey | Representational image (Photo Credits: pixabay)

गुजरातमधील (Gujarat) गांधीनगर जिल्ह्यातील देहगाम तालुका एका भयानक घटनेने हादरुन गेला आहे. या तालुक्यातील साल्की गावात एका 10 वर्षांच्या मुलावर माकडाने हल्ला (Monkey Attack) केला. ज्यामध्ये त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आणि त्याचे आतडेही फाटल्याने (Intestinal Injury) त्याचा मृत्यू झाला. घडल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक ठाकोर असे या मुलाचे नाव आहे. तो आपल्या सवंगड्यांसोबत खेळत असताना माकडांची एक टोळी तिथे आली. त्यातील एका माकडाने दीपकवर चाल केली. त्याला बचावाची संधी मिळाली नाही. परिणामी माकडाने त्याच्यावर जीवघेना हल्ला केला.

माणसांवरील हल्ल्यासाठी या परिसरात माकडांच्या टोळ्या नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे मोठी माणसे माकडाच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सतर्क असतात. मात्र, लहाण मुलांना ती काळजी घेता येत नाही. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. पोलिसांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, माकडांच्या टोळीतील एका माकडाने थेट दीपकच्या दिशेने उडी घेतली आणि त्याच्यावर हल्ला केला. घाबरलेला दीपक काही कळण्याच्या आत त्राण हरवून बसला. ज्यामुळे माकडाला अदिकच मोकळीक मिळाली. त्याने दिपकच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी चावे घेतले. तसेच, त्याच्या पोटावरही गंभीर जखम केल्याने त्याचे आतडे फाटले. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यापूर्वीच त्याला मृत घोषीत केले.

गावकऱ्यांनी घटनेबद्दल सांगताना म्हटले की, गाव आणि परसिरात माकडांकडून एकाच आठवड्यात घडलेला हा तिसरा हल्ला आहे. वन विभागाचे अधिकारी विशाल चौधरी यांनी सांगितले की, माकडांच्या हल्ल्याबाबत आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना सुरु आहेत. माकडांना पकडण्यासाठी आम्ही एक पथकही तैनात करतो आहोत. गावात माकडांच्या अनेक टोळ्या आहेत. त्यातील काही टोळ्यांमध्ये लंगूर आहेत. आतापर्यंत दोन लंगूरांना पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. आणखी काही लंगूरांना पकडण्यासाठी वेगवेगल्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.

माकडांकडून माणसांवर हल्ले होण्याची घटना देशभरात विविध ठिकाणी घडत असतात. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश राज्यातील राजगढ शहरात माकडांनी उच्छाद मांडला होता. माकडांनी जवळपास दोन आठवडे शहरात धुमाकूळ घालून नागरिकांना जेरीस आणले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी अनेक नागरिकांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये अनेकांना गंभीर जखमा झाल्या होत्या. माकडांना पकडण्यासाठी तब्बल 21,000 रुपयांचे इनामही वन विभागाने जाहीर केले होते. आक्रमक माकडांना शोधून काढण्यासाठी आणि पकडण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीमही राबविण्यात आली होती.