गुजरात : विद्यार्थ्यांमधील PUBG Addiction रोखण्यासाठी सरकारचे शाळेत खेळावर बंदीचे आदेश
PBUG Game (फोटो सौजन्य- फेसबुक)

सध्या तरूणाईच्या डोक्यावर PUBG चं खूळ आहे. देशभरात टीनएज मुलांमध्ये या खेळाचं व्यसन वाढत असल्याचा आणि त्याचा त्यांच्या मानसिक, शारिरीक आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. सातत्याने येणार्‍या अशाप्रकारच्या रिपोर्ट्सची गुजरात सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार गुजरातच्या शाळांमध्ये मुलांना खेळापासून दूर ठेवण्यासाठी संबंधित संस्थांना बंदीचे आदेश दिले आहेत.

गुजरात शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सर्क्युलरमध्ये लहान मुलांच्या हक्काच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं वेळीच उचलणं गरजेचे असल्याचे म्हटलं आहे. त्यानुसार, प्राथमिक शाळांमध्ये PUBG खेळावर बंधन घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मल्टिप्लेअरमध्ये खेळला जाणारा हा खेळ सध्या तरूणाईमध्ये लोकप्रिय आहे. त्याचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचेही म्हटले आहे.

Gujarat child rights body च्या चेअरपर्सन जागृती पांड्या यांनी राज्यात National Commission for Protection of Child Rights (NCPCR)ने PUBG खेळावर बंदी घालण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. इतर राज्यांमध्येही अशाप्रकारे PUBG वर बॅन आणण्यासाठी सुचवले जाणार आहे.