गुजरातच्या (Gujarat) भावनगर (Bhavnagar) येथून वडील-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वडिलांनी आपल्या अविवाहित 19 वर्षाच्या मुलीवर बऱ्याच वर्षांपासून बलात्कार (Rape) केला आहे. बुधवारी पीडित मुलीने स्थानिक रुग्णालयात मुलाला जन्म दिला असता हे कृत्य उघडकीस आले. जेव्हा पीडित अविवाहित मुलीला मुलाच्या वडिलांबद्दल विचारले गेले तेव्हा तिने आपल्या पित्याचे नाव घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनतर रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या 19 वर्षीय पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, आई घरात नसताना वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. तब्येत बिघडल्यानंतर तिला शिहोर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला. ही गोष्ट पाहून कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काच बसला. जेव्हा पीडितेकडे मुलाच्या वडिलांविषयी विचारणा केली गेली तेव्हा तिने आपल्या वडिलांचे नाव घेतले.
पीडित मुलीने सांगितले की, ‘माझे वडील रोजंदारीवर मजुरी करतात आणि गेल्या एका वर्षात माझ्या आईच्या अनुपस्थितीत त्यांनी अनेकदा माझ्यावर बलात्कार केला. मी झोपेत असतानाही बर्याच वेळा माझ्या वडिलांनी हे कृत्य केले.’ सतत होत असलेल्या लैंगिक छळामुळेच ही मुलगी गर्भवती राहिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताबडतोब ताब्यात घेतले. पीडित मुलीला आणि तिच्या मुलाला भावनगर वैद्यकीय सुविधेत ठेवण्यात आले आहे. पीडितेच्या आईला याची माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा: घरात बनवलेली वांग्याची भाजी संपल्याने पतीला क्रोध झाला अनावर, पत्नीवर रॉकेल ओतून जिवंत जाळले)
अहमदाबाद मिररच्या म्हणण्यानुसार, 'या संपूर्ण प्रकरणाची चौकशी भावनगर पोलिसांच्या महिला शाखेकडे देण्यात आली आहे. आरोपीला दोन मुले आणि दोन मुली आहेत. दोन मुले आणि एक मुलगी विवाहित आहेत जी स्वतंत्रपणे राहत आहेत. शिरोर परिसरातील झोपडपट्टीत आरोपी आपली मुलगी व पत्नीसमवेत राहतो.