गोरे बनवण्याचा दावा करणार्‍या उत्पादनांची जाहिरात करणे पडेल महागात; 5 वर्ष तुरूंगवास व 50 लाख दंडाचा प्रस्ताव सादर
Representational Image. (Photo Credits: File Image)

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक प्रस्ताव दिला आहे, ज्याद्वारे गोऱ्या त्वचेला (Fair Skin) प्रोत्साहन देणार्‍या फेअरनेस क्रिमच्या (Fairness Creams) जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते. तसेच या जाहिराती तयार व प्रमोट करणार्‍यांना 5 वर्ष तुरूंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. मंत्रालयाने या सूचना ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा 2020 (Drugs and Magic Remedies Act मध्ये समाविष्ट केल्या आहेत.

सध्या सरकारने 54 प्रकारच्या दिशाभूल करणार्‍या (False Claims) जाहिरातींवर बंदी घातली आहे, त्या 54 वरून 78 करण्यात येतील. जाहिरातींवर बंदी घातलेल्या यादीमध्ये लैंगिक कामगिरी वाढवण्याचा दावा करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली जाऊ शकते.

सध्या बंदी असलेल्या जाहिराती दाखवल्यास कलम 7 अंतर्गत पहिल्यांदा 6 महिने तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा वाढून 5 वर्षांची शिक्षा किंवा 50 लाख रुपयांचा दंड अशा तरतुदीचा विचार चालू आहे. दररोज टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये बर्‍याच जाहिराती असतात ज्या, गोर करणे, उंची वाढवणे, केस वाढवणे, चरबी कमी करणे, सेक्स पॉवर वाढवणे असा दावा करतात. या जाहिराती दिशाभूल करणार्‍या आहेत आणि बॉडी शेमिंगला प्रोत्साहित करतात. परंतु लवकरच, अशा उत्पादनांची जाहिरात करणाऱ्या कंपन्या आणि त्या द्वारे दिशाभूल करण्यास प्रोत्साहन देणारे सेलेब्ज यांच्यावर रोख लागू शकते. (हेही वाचा: या सावळ्या अभिनेत्री गाजवत आहेत बॉलीवूडवर अधिराज्य)

दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि खोट्या दाव्यांच्या उत्पादनांना आळा घालण्यासाठी, सरकारने ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा दाखल केला आहे. दरम्यान, काही आठवड्यापूर्वी दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी हिने एका फेअरनेस क्रीमची कोट्यावधी रुपयांची जाहिरात नाकारली होती. तिच्या या निर्णयाचे सोशल मिडियावर बरेच कौतुक झाले होते.