PF सह लघू बचत योजनेवरील व्याजदरात कपात; 1 एप्रिलपासून नवे दर लागू
Image For Representations (Photo Credits: Twitter/File)

मागील 2020 हे वर्ष पगार धारकांसाठी कठीण होते. कोरोना व्हायरस संकटकाळात (Coronavirus Pandemic) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून बहुतेक कर्मचाऱ्यांना पगारकपातीलाही सामोरे जावे लागले आहे. परंतु, 2021 हे वर्ष देखील पगार धारकांसाठी काही खास असल्याचे दिसत नाही. लहान बचत योजनेवर (Small Savings Scheme) मिळणाऱ्या व्याजदरात (Interest Rate) सरकारकडून कपात करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाकडून आलेल्या पत्रकानुसार, 1 एप्रिल 2021 पासून लघू बचत योजनेमध्ये व्याजकपात करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष (Financial Year) 2021-22 च्या पहिल्या तिमाहीसाठी व्याजदर 40-110 बेसिस पॉईंट इतका कमी केला आहे. यासोबतच पीपीएफ चा व्याजदर देखील 7 टक्क्यांपेक्षा कमी केला आहे. 1974 नंतर पहिल्यांदा व्याजदर इतका कमी झाला आहे. पीपीएफवर मिळाणारा 7.1 टक्के व्याजदर आता 6.4 टक्के इतका करण्यात आला आहे. नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेटवर मिळणारा 6.8 टक्के व्याजदर 5.9 टक्के इतका करण्यात आला आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेवर मिळाणारा 7.6 टक्के व्याजदर आता 6.9 टक्के इतका करण्यात आला आहे. यासोबतच पोस्ट ऑफिस सेव्हिंगवरील व्याजदर देखील कमी करण्यात आला आहे.

ANI Tweet:

लघू बचत योजनेवरील व्याजदर गेल्या वर्षभरात दुसऱ्यांना कमी करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जून या सत्रात व्याजदर 70-140 bps इतका कमी केला होता. आताची घट पकडता लघू बचतीवरील व्याजदर एकूण 110-250 bps इतका कमी करण्यात आला आहे. (PF साठी सरकारकडून नागरिकांना दिलासा, आता 5 लाखापर्यंतच्या गुंतवणूकीवर कर माफ)

बँकेत ठेवलेल्या फिक्स डिपॉझिटवरही मिळणारा व्याजदर आता बँकांकडून हळूहळू कमी केला जात आहे. सध्या बँकांमध्ये एफडीवर मिळणार इंटरेस्ट रेट 4.90 टक्के इतका आहे. कॅनरा बँकेसारख्या काही बँकांनी अधिक कालावधीसाठी केलेल्या फिक्स डिपॉझिटवर व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे.