सरकारकडून कांदा 22 रुपये किलोमध्ये; तरीही सर्वसामान्य जनतेला मोजावे लागत आहेत 70 रुपये प्रति किलो
Onions (Photo Credits: IANS)

Onion Price In India: अवकाळी पावसामुळे, शेतीचं नुकसान झालं असल्याने, देशभरात कांद्याचे भाव काही महिन्यापासून अगदी गगनाला भिडले होते. त्यामुळे, देशाने तब्बल अठरा हजार टन कांदा आयात केला असून तो सध्या 22 रुपये प्रति किलोने विकला जात असल्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. तसं असलं तरी, बाजारात मात्र सर्व सामान्य जनतेला प्रत्यक्षात 70 रुपये प्रति किलोनेच कांदा विकला जात आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत पासवान म्हणाले, "सरकारने आजपर्यंत १८ हजार टन कांदा आयात केला आहे. मात्र, अनेक प्रयत्न करुनही आत्तापर्यंत कवेळ 2000 टन कांद्याचीच विक्री होऊ शकली आहे. कांद्याची किंमती बाजारात कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे."

दरम्यान, आसामने 10,000 टन, महाराष्ट्राने 3480 टन, हरयाणाने 3000 टन आणि ओडिशाने 100 टन कांद्यांची मागणी केली होती. तसं असलं तरी आता मात्र या राज्यांनी आयात करण्यात आलेल्या कांद्याला खरेदी करण्यास नकार दिल्याचेही पासवान यांनी आज पत्रकारांसमोर सांगितले.

खुशखबर! कोल्हापूरकरांवरील संक्रांत संपली; 520 रुपये किलो ने मटण विक्रीवर झाला एकमताने निर्णय

जनतेला कांदा स्वस्त दरात मिळावा या साठी केंद्र सरकार नाफेड आणि राज्य सरकारांमार्फत विशेष स्टॉल लावून कांदा विक्रीचे विशेष प्रयत्न करत आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेला कांद्याच्या वाढलेल्या  भावातून अद्यापही दिलासा मिळालेला नाही हेच खरं.

आता बाजारात कांदा नक्की 22 रुपये किलोने कधी मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.