Government Jobs: केंद्र सरकारच्या विभागांमध्ये सुमारे 9.79 लाख पदे रिक्त; लवकरच होणार भरती
Job ( Photo Credit - File Image)

सरकारने बुधवारी लोकसभेत माहिती दिली की 1 मार्च 2021 पर्यंत, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये सुमारे 9.79 लाख पदे रिक्त (Vacant Posts) आहेत, तर एकूण पद मंजूर संख्या 40.35 लाख आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी खालच्या सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, व्यय विभागाच्या पेमेंट रिसर्च युनिटच्या वार्षिक अहवालानुसार, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांतर्गत गेल्या वर्षी 1 मार्चपर्यंत 40,35,203 मंजूर पदे होती.

अहवालानुसार, या तारखेपर्यंत केंद्र सरकारच्या विभागांमध्ये 30,55,876 कर्मचारी कार्यरत आहेत. सिंग म्हणाले, ‘केंद्र सरकारमधील पदे निर्माण करणे आणि भरणे ही संबंधित मंत्रालय/विभागाची जबाबदारी आहे आणि ही निरंतर प्रक्रिया आहे.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारचे अनेक विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात 10 लाख जणांची भरती करण्यास सांगितले होते.

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग आणि त्यांच्या संलग्न किंवा अधीनस्थ कार्यालयांमध्ये रिक्त पदे ही सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा किंवा मृत्यू इत्यादीमुळे उद्भवतात. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये/विभागांना रिक्त पदे वेळेत भरण्यासाठी कृती करण्याची विनंती करण्यात आली आहे. (हेही वाचा: घरून काम करण्याबद्दल सरकारचा नवा नियम; आता कर्मचारी एक वर्ष करू शकणार वर्क फ्रॉम होम)

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सरकारच्या विविध विभागांमधील एकूण 800 पदांची भरती प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. त्यासाठी MPSC कडून 8 ऑक्टोबर 2022 ला परीक्षा घेण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. पुणे महानगरपालिकेने 448 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 20 जुलै 2022 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार PMC च्या अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर 10 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.