गोवा: कोरोना व्हायरसमुळे 14 वर्षीय मुलीसह 33 जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मागितली माफी
Vishwajit Rane (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 13 लाखांच्या पार गेला आहे. याच दरम्यान आता गोव्यात (Goa) अचानक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले गेले. गोव्यात सध्या कोरोनाचे 1526 रुग्ण आढळून आले आहेत. याच दरम्यान गोव्यात कोरोनामुळे 14 वर्षीय मुलीसह 33 जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माफी मागितली आहे. गोव्यात कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर हा अन्य राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचे ही राणे यांनी म्हटले आहे.

गोवा यापूर्वी ग्रीन झोन म्हणुन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे गोव्यात लॉकडाऊनच्या नियमात शिथीलता आणत काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु फक्त अत्यावश्यक सेवासुविधाच सुरु राहणार असल्याचे म्हटले होते. तर पब, जिम, ब्युटी पार्लर, मसाज पार्लर यांसारख्या गोष्टींवर स्थानिक प्रशासनाने बंदी घातली होती. मात्र हळूहळु कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर ते आतापर्यंत दिवसागणिक नव्याने संक्रमितांची भर पडत आहे.(भारतात COVID19 चा रिकव्हरी रेट 63.92 टक्क्यांवर पोहचला; 36,145 रुग्णांची प्रकृती सुधारल्याची आरोग्य विभागाची माहिती)

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची 27 जुलै ची आकडेवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यानुसार, मागील 24 तासात कोरोनाचे तब्बल 49,931 नवे रुग्ण देशभरात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 14 लाख 35 हजार 453 वर पोहचली आहे. यातील 4,85,114 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर, 9,17,568 रुग्णांनी आजवर कोरोनावर मात करून डिस्चार्ज घेतला आहे. मागील 24 तासात देशात कोरोनामुळे तब्बल 708 जणांना प्राण गमवावे लागले असून सध्या देशातील कोरोना मृतांची संख्या 32,771 वर पोहचली आहे. यामध्ये एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि ऍक्टिव्ह रुग्ण यांच्यातील फरक पहिल्यास देशातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे.