![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/Goa-CM-Pramod-Sawant--380x214.jpg)
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) महाराष्ट्रात 15 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. अशा परिस्थितीमध्ये टीव्हीवरील अनेक कार्यक्रम मुंबईबाहेर हलविण्यात आले आहेत. रियालिटी शो असो किंवा टीव्ही मालिका जवळजवळ प्रत्येक निर्मात्याने मुंबईबाहेर शुटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गोव्यातही (Goa) काही टीव्ही सीरियलचे शूटिंग सुरू आहे ज्यामुळे गोव्यातील कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता गोव्यात शूटिंगला विरोध दर्शविला जात आहे. आता गोवा सरकारने चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांचे शूटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
एन्टरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) ने गुरुवारी राज्यातील कोविड-19 च्या वाढत्या घटना पाहता, चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी दिलेल्या सर्व प्रकारच्या परवानगी रद्द केल्या आहेत. ईएसजी ही गोवा सरकारची नोडल एजन्सी आहे ज्यास राज्यात व्यावसायिक शुटिंगला परवानगी देण्याचा अधिकार आहे. ईएसजीचे उपाध्यक्ष सुभाष फलदेसाई यांनी पीटीआयला सांगितले की, देशात अनेक ठिकाणी कोरोना संसर्ग वाढल्याने मुंबई आणि चेन्नई मधील अनेक चित्रपट व दूरदर्शन कार्यक्रम निर्मात्यांनी गोव्यामध्ये शूटिंग सुरू केले आहे. (हेही वाचा: कोरोना महामारी स्थिती हाताळण्याच्या नेतृत्वाबाबत नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया, सुब्रमण्यम स्वामी यांनी मांडली होती भूमिक)
ते पुढे म्हणाले की, ‘राज्यात परिस्थिती सामान्य होईपर्यंत गोव्यातील चित्रपटांच्या व मालिकांच्या शूटिंगसाठी दिलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या मागे घेण्यात आल्या आहेत. आम्ही राज्यातील कोणत्याही सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता क्षेत्रात चित्रपटांचे आणि मालिकांचे शूटिंग करू देणार नाही. जे लोक सध्या इथे शुटींग करत आहेत त्यांनाही लवकरात लवकर त्यांचे काम पूर्ण करण्या सांगण्यात आले आहे.’ परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ईएसजी आपल्या निर्णयाचा आढावा घेईल. यासह गोव्यात कलम 144 लागू आहे, म्हणजेच 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे.