Smartphone Hacked: उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या 'स्मार्ट'फोनमधून चावट मेसेज सेंड,  म्हणाले 'मी तर झोपलो होतो'
Obscene Messages | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गोव्याचे उपमुख्यमंत्री (Goa Deputy Chief Ministe) चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Babu Kavlekar) यांचा स्मार्टफोन हॅक झाल्याचे वृत्त आहे. चंद्रकांत कवळेकर यांच्या फोनवरुन एक अश्लिल मेसेज (Obscene Messages) पाठविण्यात आला. सोमवारी (19 ऑक्टोबर 2020) पहाटे 1.20 वाजता हा प्रकार घडला. चंद्रकांत कवळेकर यांना याबाबत समजले तेव्हा त्यांनाही या प्रकाराबाबत धक्का बसला. प्राप्त माहितीनुसार, कवळेकर यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली असून, या तक्रारीत त्यांनी आपला फोन अज्ञाताकडून हॅक झाल्याचा दावा केला आहे. हा प्रकार घडला तेव्हा आपण झोपलो होतो असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी म्हटले आहे.

चंद्रकांत कवळेकर यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, काही समाजकंटकांनी 'Villages of Goa' या व्हॅट्सअॅप ग्रुपवर कावळेकर यांच्या फोनवरुन अश्लील व्हिडिओ पाठवण्यात आला. हा संदेश माझ्या फोनवरुन जेव्हा पाठविण्यात आला तेव्हा मी झोपलो होतो. तसेच, हा मेसेज केवळ एकाच ग्रुपवर पाठविण्यात आल्याचेही कवळेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

फोन हॅक करुन अथवा फोनमध्ये छेडछाड करुन मेसेज पाठविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कवळेकर यांनी केली आहे. तसेच, आपली प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानेच कोणीतरी जाणीवपूर्वक असा प्रकार केल्याचा आरोपही कवळेकर यांनी केला आहे. कवळेकर यांनी आरोप करताना कोणाचाही नामोल्लेख केला नाही. (हेही वाचा, वाशिम: शाळेतील वर्गमित्राने विद्यार्थिनीचा अश्लिल व्हिडिओ काढल्याने आत्महत्या)

दुसऱ्या बाजूला या व्हिडिओ मेसेजवरुन राजकारण रंगण्याचीही चिन्हे दिसत आहेत. कारण गोवा विधानसभेतील विरोधी पक्षाने उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या विरोधात पोलीसांत तक्रार दिली आहे. काँग्रेस पक्षाने ही तक्रार केल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, गोवा फॉरवर्ड पार्टीच्या काही महिला कार्यकर्त्यांनीही कवळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.