Ghaziabad News: गाझियाबाद येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित सुरक्षा रक्षक महिलेचा (Ghaziabad Gang Rape) मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजय नामक आरोपीला (वय 32 वर्षे) अटक केली आहे. आरोपींमध्ये तिच्या सहकाऱ्यांचाच समावेश असून त्यात एका सुपरवायझरचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी तिच्यावर अत्याचार झाला होता. त्यानंतर आरोपी आणि तिचे काही इतर सहकर्मचाऱ्यांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. अखेर तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित महिला ही मूळची झारखंडची आहे. ती आपल्या मावशीसोबत हौसिंग सोसायटीच्या परिसरात राहात होती. या सोसायटीतच ती सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करत होती. या सोसायटीच्या तळघरातच तीन पुरुषांनी तिच्यावर बालात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिने विष प्राशन केल्याने तिला दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना गाझियाबादमध्ये घडली असताना तिला ग्रेटर नोएडा, दिल्ली येथील रुग्णालयात का दाखल करण्यात आले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. पीडितेच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोसायटीकडे धाव घेतली. तसेच, पोलिसांमध्ये जाऊन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तातडीने तपासास सुरुवात केली. या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक आगोदरच केली आहे. तर उर्वरीत दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने डीसीपी (ग्रामीण) विवेक चंद यादव यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बलात्काराच्या कलमाखाली (376 आयपीसी) एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी महिलेवर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी तळघरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवले आहे ज्यामध्ये सामूहिक बलात्काराची कोणतीही घटना आढळून आली नाही. चंद यादव यांनी पुढे असेही म्हटले आहे की, पीडितेचा मृत्यू विष प्राशन केल्याने फुफ्फुसाच्या आजारामुळे मृत्यू झाला की इतर काही कारणामुळे हे तपासण्यासाठी व्हिसेरा फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.