दिल्लीतील (Delhi) सरोजिनी नगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांचा तपास सुरु होता. आता या प्रकरणाचे गूढ उकळले आहे. हे प्रकरण हत्येचे होते पण यामध्ये समलिंगी संबंधांसह (Gay Sexual Relationship) ब्लॅकमेलिंगचा अँगल समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकासह तिघांना अटक केली आहे. सुटकेसमध्ये सापडलेला मृतदेह 22 वर्षीय तरुणाचा असल्याचे समोर आले आहे. हा तरुण व्यावसायिकाच्या ठिकाणी सेल्समन म्हणून काम करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्याच सेल्समनशी लैंगिक संबंध होते. काही काळ सर्व काही सुरळीत चालले मात्र काही दिवसांनी सेल्समनने व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आपल्या बॉसकडून भरघोस पैसे उकळण्याचा त्याचा डाव होता. तरुणाने सतत पैशांसाठी तगादा लावला होता. यामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने त्याला जीवे मारण्याचा कट रचला.
तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. यादरम्यान हा तरुण शेवटचे व्यावसायिकासोबत दिसला. त्यानंतर पोलिसांनी व्यावसायिकाची कडक चौकशी केली असता त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. या तरुणासोबत त्याचे शारीरिक संबंध असल्याचे व्यावसायिकाने कबूल केले. तरुणाने व्यावसायिकासोबत संबंध बनवताना गुपचूप व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच त्याच्या कुटुंबीयांना ते दाखवण्याची धमकी देत त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
व्यावसायिकाने सांगितले की, तो विवाहित आहे आणि त्याला दोन मुले आहेत. बदनामी होण्याच्या भीतीने तो घाबरला आणि तरुण याचाच फायदा घेत पैसे उकाळत राहिला. परंतु यामुळे त्रस्त झालेल्या व्यावसायिकाने तरुणाच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने 28 जानेवारी रोजी खुर्जा येथून आपल्या पुतण्याला आणि त्याच्या मित्राला बोलावून युसूफ सराय येथील गेस्ट हाऊसमध्ये थांबवले. (हेही वाचा: मुंबईमध्ये पहिल्यांदाच मोठ्या 'गे सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश; तरुण मुले पुरवण्याचे आश्वासन देत अनेकांना लुबाडले, तिघांना अटक)
त्यानंतर व्यापारी तरुणासह गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला. तेथे त्याने तरुणाचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये टाकून सरोजिनी नगर येथील मेट्रो स्टेशनजवळील निर्जन भागात फेकून दिला. पोलिसांनी आता तिन्ही आरोपींना अटक केली आहे. 19 जानेवारीलाच या तरुणाला मारण्याचा प्रयत्न असल्याचे व्यावसायिकाने सांगितले. मात्र प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कडेकोट बंदोबस्तामुळे त्याला तसे करता आले नाही. त्यामुळे त्याने 26 जानेवारीची वाट पाहिली.