Bhima Koregaon Case: आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांच्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून
Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

Bhima Koregaon Case: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा (Gautam Navlakha) आणि आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) यांच्या याचिकेवर सुनावणी केली. गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांनी आत्मसमर्पण करण्यासाठी वेळ वाढवून मिळावा यासाठी याचिकेद्वारे न्यायालयाकडे मागणी केली होती. नवलाखा आणि तेलतुंबडे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, दोघांचेही वय 65 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना हृदयासंबंधीचे आजार आहेत. सध्या कोरोना व्हायरस संकट देशावर आहे. अशा स्थितीत त्यांना पुन्हा कारागृहात परतण्यास सांगणे म्हणजे त्यांना मृत्यूची सजा दिल्याप्रमाणेच आहे.

आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्या याचिकेवर आक्षेप घेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटले की, न्यायालयाने ही विनंती विचारात घेऊ नये. आरोपी केवळ अधिकचा वेळ वाढवून मिळावा यासाठी बहाना शोधत आहेत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. (हेही वाचा, भीमा - कोरेगाव हिंसाचार प्रकरण: आनंद तेलतुंबडे यांच्या जामिनावरील सुनवाईला 2 एप्रिलपर्यंत स्थगिती)

एएनआय ट्विट

दरम्यान, या आधी 18 मार्च रोजी भीमा कोरेगाव आयोग (Bhima Koregaon Commission) या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना 4 एप्रिल रोजी आयोगासमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. भीमा कोरेगाव दंगल नेमकी कोणत्या कारणामुळे झाली होती, याबाबत हा आयोग चौकशी करत आहे.