विद्यार्थी महाविद्यालयात अभ्यासासाठी प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांसह त्यांचे कुटुंब आणि शिक्षक देखील विद्यार्थी चांगला अभ्यास करून यशस्वी होण्याचे ध्येय बाळगून असतात. मात्र काही वेळा काही विद्यार्थी भरकटतात. ते चुकीच्या लोकांच्या संगतीत येतात आणि गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकातील शिवमोग्गा (Shivamogga) येथे समोर आला आहे. कर्नाटकमधील शिवमोग्गा पोलिसांनी तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांना गांजाची (Ganja) लागवड आणि विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
शिवमोग्गा येथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाड्याच्या घरात चक्क गांजाची शेती सुरू केली. त्यानंतर ते त्याची विक्री करू लागले. ही बाब समोर आल्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांनी तामिळनाडू आणि केरळमधील तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. हे विद्यार्थी त्यांच्या भाड्याच्या घरात हायटेक शेती करून गांजा पिकवत होते. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नराज असे मुख्य आरोपीचे नाव आहे, जो तामिळनाडूमधील कृष्णगिरीचा रहिवासी आहे. विघ्नराज हा एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि त्याच्या भाड्याच्या घरात गांजा पिकवताना आढळून आला आहे.
Karnataka | Three persons, identified as Vighnaraj, Pandidorai and Vinod Kumar, were arrested for growing and selling cannabis. Vighnaraj, a student of a private medical college, was growing cannabis at home through hi-tech farming and selling it to other college students. 227… pic.twitter.com/hpVrBaHx77
— ANI (@ANI) June 25, 2023
शिवमोग्गाचे पोलीस अधीक्षक जीके मिथुन कुमार म्हणाले, ‘आरोपी गेल्या साडेतीन महिन्यांपासून या व्यवसायात गुंतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. केरळमधील इडुक्की येथील रहिवासी विनोद कुमार आणि तामिळनाडूतील धर्मापुरी येथील रहिवासी पांडिदोरई आरोपीला गांजा विक्रीसाठी मदत करायचे. हे दोघे जेव्हा आरोपीच्या घरी गांजा खरेदीसाठी आले होते त्याचवेळी पोलिसांनी घरावर छापा टाकला.
छाप्यात पोलिसांनी 227 ग्रॅम गांजा, 1.53 किलो कच्चा गांजा, 10 ग्रॅम चरस, गांजाच्या बिया असलेली एक छोटी बाटली, गांजाच्या तेलाच्या 3 सिरिंज, गांजा पावडर बनवण्यासाठी वापरलेले दोन कॅन, एक इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले. आरोपींकडून वजनाचे यंत्र आणि रोख 19,000 रुपयांसह अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यासह पोलिसांनी तिन्ही विद्यार्थ्यांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: GST Scam: ईलेक्ट्रॉनिक वे बिल तयार करत 15,000 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा, युपीतून पोलीसांनी १५ जणांना घेतले ताब्यात)
दरम्यान, या वर्षी जानेवारी महिन्यात मंगळुरू पोलिसांनी गांजाची विक्री करणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन किलो दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणांच्या आधारे, मंगळुरू पोलीस आयुक्त म्हणाले की, किनारी जिल्ह्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेले आहेत.