Petrol, Diesel च्या दरात घट कायम, सामान्यांना दिलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

दिवसागणित पेट्रोल डिझेलच्या किंमतीत (Petrol, Diesel Price) सातत्याने होणारी घट सामान्यांसाठी नक्कीच दिलासादायक आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट पाहायला मिळाली. मुंबई-दिल्लीत आज पेट्रोल 50 पैशांनी स्वस्त झालं. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 73.57 रुपये प्रती लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 79.12 रुपये प्रती लीटरने मिळत आहे.

18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर ही घट कायम दिसून आली. आज दिल्लीत डिझेलची किंमत 68.49 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत डिझेल 71.71 रुपये प्रती लीटरने मिळत आहे.

दिल्ली, मुंबईसोबतच चेन्नई आणि कोलकत्ता मध्ये देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. चेन्नईत पेट्रोल 53 पैशांनी स्वस्त झाल्यामुळे 76.35 रुपये प्रती लीटरने मिळत आहे. तर कोलकत्तामध्ये 49 पैशांनी घट झाल्याने पेट्रोल 75.57 रुपये प्रती लीटरने विकले जात आहे.

पेट्रोलसोबतच डिझेलच्या किंमतीतही घट झाल्याचे दिसून आले. चेन्नईत डिझेल 43 पैशांनी स्वस्त झाले असून कोलकत्तामध्ये 40 पैशांनी घट झाली आहे. त्यामुळे चेन्नईत डिझेल 72.34 रुपये प्रती लीटर आणि कोलकत्तामध्ये 70.34 रुपये प्रती लीटरने डिझेल विकले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमतीत घट झाल्याने याचा फायदा सामान्यांनाही होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत 2.50 रुपयांनी घट झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे सामान्यांच्या सुविधेसाठी इंधनाची किंमत कमी करण्यासाठी विनंती अरुण जेटली यांनी राज्य सरकारला केली आहे.