Gwalior Accident: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील भितरवार तालुक्यातील करहिया गावात मंगळवारी संध्याकाळी वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) निरंजन शर्मा यांनी सांगितले की, ही घटना घडली जेव्हा काही लोक महसूल अधिकाऱ्यांसह त्यांच्या शेताचे मोजमाप करत होते आणि अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यांनी सांगितले की, स्वत:ला वाचवण्यासाठी ते एका झाडाखाली आणि झोपडीखाली थांबले, त्यावेळी अचानक वीज पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. शर्मा म्हणाले की, पप्पू परमार (50), कुक्कू तिवारी (65), हरिसिंह कुशवाह (40) आणि उदयनसिंग कुशवाह (22) अशी मृतांची नावे आहेत. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महसूल अधिकाऱ्यांनी झोपडीखाली आश्रय घेतला, जेथे विजेचा प्रभाव तुलनेने कमी होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेवर शोक व्यक्त करताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.