Chandrababu Naidu Breaks Down: टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना पत्नीवरील टीकेमुळे अश्रू अनावर, सत्ताप्राप्तीशिवाय विधानसभेत प्रवेश न करण्याची घेतली शपथ
Chandrababu Naidu | (Photo Credit: Twitter)

तेलुगू देशम पार्टी (TDP) पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी अत्यंत भावूक होत साश्रुनयनांनी आपला निश्चय जाहीर केला. जोपर्यंत सत्ताप्राप्ती होत नाही. तोपर्यंत आंध्र प्रदेश विधानसभा सभागृहात पाऊल ठेवणार नाही, असा निर्णयच त्यांनी जाहीर केला. सत्ताधारी YSR काँग्रेस पक्षाच्या सदस्यांकडून त्यांच्याबाबत टीका करताना वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांमुळे चंद्राबाबू नायडू अस्वस्थ आहेत. त्यांची ही अस्वस्थता विधिमंडळात बाहेर आली. नायडू यांनी म्हटले की, 'पाठिमागील 2.5 वर्षांमध्ये मी अपमान सहन करत असून, मी शांत आहे. आज तर त्यांनी माझ्या पत्नीलाही लक्ष्य केले. मी नेहमीच सर्वांसोबत सन्माने राहिलो आहे. आता यापुढे मी यापेक्षा अधिक टीका सहन करु शकत नाही. आता सत्ताप्राप्तिशिवाय विधिमंडळात पाऊल ठेवणार नाही.'

विधानसभा अध्यक्ष तिम्मिनेनी सीताराम यांनी सभागृहात नायडू यांचा माईक बंद केला. तरीही त्यांनी आपले भाषण सुरु ठेवले. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नायडू यांचे वर्तन म्हणजे केवळ ढोंग असल्याचे म्हटले. कृषी विषयावर एका छोट्या चर्चेत सभागृहात दोन्ही पक्षांमध्ये (सत्ताधारी आणि विरोधक) जोरदार घमासान झाले. यावरुन माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक आचानक बोलावली. या बैठकीत ते अत्यंत भावूक झाले. टीडीपी आमदारांनी समजूत काढल्यानंतर चंद्राबाबू नायडू पुन्हा सभागृहात आले. (हेही वाचा, ISRO चीफ के. सिवन यांना अश्रू अनावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठी मारत दिला धीर (Watch Video))

ट्विट

चंद्राबाबू नायडू यांनी आता थेट घोषणा केली की, 'सत्ताप्राप्ती झाल्याशिवाय आपण विधानसभेत प्रवेश करणार नाही'. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगु देशम पक्षाला विधानसभा निवडणूक 2019 मध्ये जगन रेड्डी यांच्या वाय एसआर काँग्रेस द्वारा पराभव स्वीकारावा लागला होता. 175 जागांच्या विधानसभेत जगन रेड्डी यांच्या पक्षाला 151 जागा मिळाल्या. तर चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला केवळ 23 जागा मिळाल्या. एक जागा पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला मिळाली. 2014 मध्ये टीडीपीने 102 आणि वायएसआर काँग्रेसने 67 जागा मिळवल्या होत्या.