इमारत (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना महामारीच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रावर वाईट परिणाम झाला होता, परंतु आता हे क्षेत्र पुन्हा रुळावर येत आहे. नवनवीन प्रकल्प सुरू होत आहेत आणि ते यशस्वीही होत आहेत. विशेषत: गृहनिर्माण प्रकल्पांची मागणी वाढली आहे. त्यातही प्रीमियम प्रकल्पांना अधिक पसंती दिली जात आहे. देशात एकीकडे मोठ्या घरांची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे एक शहर असे आहे जिथे फ्लॅट्सचा आकार (Flat Sizes) कमी होत चालला आहे.

अॅनारॉकच्या (ANAROCK) अहवालात गेल्या 5 वर्षांत देशातील 7 शहरांमध्ये सरासरी फ्लॅटच्या आकारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच येथे बांधलेल्या फ्लॅटचा आकार पूर्वीपेक्षा वाढला आहे. मात्र मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) हे एक असे शहर आहे, जिथे फ्लॅटचा आकार मोठ्या प्रमाणात कमी होत चालला आहे. यासह चेन्नई शहरात मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फ्लॅट्सचा आकारात घट नोंदवली आहे.

गेल्या एका वर्षात चेन्नईमध्ये बांधल्या जाणाऱ्या फ्लॅट्सचा आकार सुमारे सहा टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवाल सांगण्यात आले आहे. तर मुंबईमधील फ्लॅट्सचा आकार 5 टक्क्यांनी कमी झाला आहे. चेन्नईमध्ये 2022 च्या पहिल्या तिमाहीत फ्लॅटचा सरासरी आकार 1,250 sqft होता, जो 2023 च्या पहिल्या तिमाहीत 1,175 sqft वर आला. तर, मुंबईमध्ये हा आकार 783 sqft वरून 743 sqft वर आला आहे.

अॅनारॉक ग्रुपचे चेअरमन अनुज पुरी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत मुंबई हे एकमेव शहर आहे, जिथे फ्लॅटचा आकार कमी होत चालला आहे. शहरात 2018 मध्ये सरासरी फ्लॅट्सचा आकार 932 sqft होता आणि आता 2023 च्या पहिल्या तिमाहीत तो 743 sqft वर आला. याचा अर्थ गेल्या 5 वर्षांत मुंबईमधील फ्लॅट्सच्या आकारात तब्बल 20 टक्क्यांनी घट झाली आहे.

अहवालानुसार, फ्लॅट्सचा आकार वाढलेल्या टॉप 7 शहरांमध्ये एनसीआर (नॅशनल कॅपिटल रिजन) आघाडीवर आहे. एनसीआरमध्ये गेल्या पाच वर्षांत सरासरी फ्लॅट आकारात सर्वाधिक वाढ झाली आहे. 2018 मध्ये हा आकार सुमारे 1,250 sqft होता आणि 2023 च्या पहिल्या तिमाहीत तो 1,700 sqft पर्यंत पोहोचला. एनसीआरचे विकासक ग्राहकांच्या मागणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्यानुसार इथे मोठ्या आकाराची घरे बांधली जात आहेत.

पुरी म्हणाले की, कोरोनापूर्वी लोकांच्या बजेटमध्ये सहज येऊ शकतील अशा कॉम्पॅक्ट घरांना जास्त मागणी होती, परंतु 2020 मध्ये, खरेदीदारांची निवड पूर्णपणे बदलली आहे. घरातून काम सुरु झाल्यानंतर मोठ्या घरांकडील कल वाढला आहे. अहवालात म्हटले आहे की, 2018 पासून ते 2022-23 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत देशातील 7 शहरांमधील सरासरी फ्लॅट आकार 6.5 टक्क्यांनी वाढला आहे. यामध्ये बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, एनसीआर, कोलकाता आणि पुणे यांचा समावेश आहे. (हेही वाचा: CIDCO Lottery 2023: नवी मुंबईत सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी)

महत्वाचे म्हणजे कोलकातामध्ये सरासरी फ्लॅट आकारात 44 टक्के वाढ झाली आहे. पुण्यात फ्लॅट्सच्या आकारात वार्षिक 16 टक्के वाढ नोंदवली गेली. 2022 च्या पहिल्या तिमाहीत तो 877 sqft वरून 2023 च्या पहिल्या तिमाहीत 1,013 sqft पर्यंत पोहोचला.