CIDCO (संग्रहित संपादित प्रतिमा)

नवी मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लगेचच ही सोडत निघणार आहे. अनेक व्यक्ती यंदाच्या लॉटरीची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. अशात सिडकोच्या घरांच्या किंमती काही प्रमाणात वाढवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ही किंमत काहींच्या खिशाला परवडणारी नसल्याने नागरिक सि़डकोच्या घराकडे पाठ फिरवतानाही दिसले आहेत. नवी मुंबईतील सिडकोच्या अनेक घरांची विक्री शिल्लक आहे.

एकाच वेळी 5000 घरांची सोडत काढून सर्व घरांची विक्री करण्याचे नियोजन सिडको प्राधिकरणाने आखले आहे. सदर लॉटरीमध्ये प्रथम येणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाणार आहे. सध्याची सोडत तळोजा नोडमधील घरांसाठी आहे. त्यानंतर निघणारी सोडत ही नवी मुंबई कार्यक्षेत्रातील वाशी, जुईनगर, खारघर, मानसरोवर, उलवे, कळंबोली येथील असणार आहे. सध्या या शहरांमध्येही घरांचे बांधकाम सुरु आहे.

मुंबई आणि मुंबईच्या परिसरात सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडा आणि सिडको करत आहेत. पंरतू सध्या दोन्ही संस्थांकडून देखील घराच्या किंमतीत वाढ करण्यात आल्यामुळे हे घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. यामुळे या घराकडे सामान्य लोक पाठ फिरवताना दिसत आहे. यामुळे अनेक सिडकोची आणि म्हाडाची घरे खाली पडलेले दिसून येत आहे.