Ludo Game | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आझमगड (Azamgarh) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगा मोबाईलमध्ये ऑनलाइन लुडो (Online Ludo Game) खेळत असल्याचे पाहून वडिलांनी मुलाला अमानुष मारहाण केली. या मारहाणीनंतर मुलाचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीने आपल्या भावांसह मुलाचा मृतदेह नदीच्या काठावर पुरला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. आता पोलीस आरोपींच्या भावांच्या शोधात आहेत. हा मुलगा अवघ्या 8 वर्षांचा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आझमगड जिल्ह्यातील रौनापार पोलीस स्टेशन हद्दीतील महुला बगीचा येथील रहिवाशी जितेंद्र निषाद याला एक मुलगा आहे, त्याचे नाव लकी उर्फ ​​धरमवीर आहे. 4 जून रोजी सायंकाळी लकी वडिलांच्या मोबाईलमध्ये लुडो गेम खेळत होता. मुलाला मोबाईलमध्ये लुडो गेम खेळताना पाहून वडिलांना राग आला आणि त्यांनी मुलाला मारहाण केली. मारहाणीमुळे लकी गंभीर जखमी झाला. लकीची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास लकीचा मृत्यू झाला.

त्यानंतर जितेंद्रने भावांच्या मदतीने लकीचा मृतदेह नदीच्या काठावर पुरला. मंगळवारी सायंकाळी लकीची आजी व आईने माहुला पोलीस चौकीत मुलाच्या हत्येची फिर्याद दिली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडील जितेंद्रला अटक केली असून त्याच्या भावांचा शोध सुरू आहे. (हेही वाचा: PUBG: ऑनलाईन पबजी गेम खेळताना एकाची हत्या, पोलिसांकडून तिघांना अटक)

दरम्यान, याआधी मोबाईलवर लुडो गेम खेळताना पराभव झाल्यामुळे 22 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली होती. ही धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडली होती. या प्रकरणातील आरोपी हे नात्याने भाऊ असून कन्नड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली होती. हे दोघेही जनावरांना चारण्यासाठी गावाजवळील जंगलात गेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला.