ऑनलाईन पबजी (PUBG ) गेम खेळताना दोन मित्रांमध्ये टोकाचा वाद झाला. हा वाद एकाच्या जीवावर उठला. ठाणे पोलिसांनी (Thane Police) या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. तो 20 वर्षांचा आहे. याच प्रकरणात आणखी दोन अल्पवयीन तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ठाणे शहरातील वर्तक नगर (Vartak Nagar) परिसरात सोमवारी (28 फेब्रुवारी) रात्री घडली. एरवी शांत असलेले वर्तकनगर या घटनेमुळे हादरुन गेले आहे.
वर्तकनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी म्हटले की, चार दोस्त नेहमीच पबजी खेळत असत. त्यांच्यात पबजीवरुन नेहमीच वाद होत असत. याही वेळी या चौघांपैकीच कोणाच्या तरी बोलण्यातून वाद सुरु झाला. सुरुवातीला किरकोळ बाचाबाचीतून वादास सुरुवात झाली. या बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या वादात झाले. त्यानंतर हे प्रकरण आपसात मिटले. दरम्यान, त्यांनी दुसर्यांदा हा गेम खेळण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांनी पुन्हा मद्यप्राशनही केले. त्यानंतर तिघांनी मिळून आपल्याच मित्रावर खुनी हल्ला करत त्याची हत्या केली. (हेही वाचा, PUBG Game Addiction: पबजी गेमच्या व्यसनातून अल्पवयीन मुलाकडून आईसह तीन भावा-बहिणीची हत्या)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी पुढील माहिती देताना म्हटले की, पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयाला पाठवून देण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी मंगळवारी (1 फेब्रुवारी) आरोपींना अटक केले आहे. त्यात एका 20 वर्षी आणि उर्वरीत दोन अल्पवयीन तरुणांचा समावेश आहे. या तिघांवर भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.