Farmer Denied Entry to Bengaluru Metro: अस्वच्छ कपड्यांमुळे शेतकऱ्याला बेंगळुरू मेट्रोमध्ये प्रवेश नाकारला; सुरक्षा कर्मचारी बडतर्फ, BMRCL ने जारी केले स्पष्टीकरण (Watch Video)
Farmer Denied Entry to Bengaluru Metro

बेंगळुरू मेट्रो स्टेशनचा (Bengaluru Metro Station) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे शहरातील सार्वजनिक वाहतूक 'नम्मा मेट्रो'मध्ये एका शेतकऱ्याचा कथित अपमान झाल्याची घटना समोर आली आहे. या शेतकऱ्याला मेट्रोमध्ये प्रवेश नाकारला गेला होता. माहितीनुसार, ही घटना शहरातील राजाजीनगर मेट्रो स्टेशनवर घडली. एका शेतकऱ्याने खराब कपडे परिधान केल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मेट्रोमध्ये चढण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर याबाबत अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. युजर्सनी या घटनेचा कडाडून विरोध केला.

त्यानंतर या घटनेची दाखल घेत प्रशासनाने आरोपी कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ केले. याबाबत बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने माहिती दिली आहे. नम्मा मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक आहे. राजाजीनगर येथे घडलेल्या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अहवालानुसार, राजाजीनगर मेट्रो स्टेशनवर एक शेतकरी मेट्रोमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याचे कपडे पाहून मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याला प्रवेश नाकारला. त्यानंतर मेट्रो कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला आत जाऊ न दिल्याने संतप्त झालेल्या सहप्रवाशांनी कर्मचाऱ्यांची पर्वा न करता शेतकऱ्याला मेट्रोमध्ये नेले. मेट्रो कर्मचाऱ्याचे शेतकऱ्याचा अपमान करणारे हे वर्तन एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. त्यानंतर त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत पोस्ट लिहिली. यामध्ये BMRCL ला टॅग करून विचारले की मेट्रो फक्त VIP लोकांसाठी आहे का?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर याबाबतचा संताप सोशल मीडियावर वेगाने पसरला. सोशल मीडियावर लोकांनी विचारले की, 'तुम्ही चांगले कपडे घातले असाल तरच तुम्हाला मेट्रोच्या आत जाण्याची परवानगी आहे का? गरिबांना मेट्रो प्रवास सेवा मिळू शकत नाही का? अशाप्रकारे शेतकऱ्याला मेट्रोमध्ये जाऊ न देणाऱ्या राजाजीनगर मेट्रो कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा जनतेने विरोध केला. (हेही वाचा: India’s Poverty Level: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी; देशातील गरिबीची पातळी 5 टक्क्यांच्या खाली- NITI Aayog CEO)

त्यानंतर बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL) ने सोमवारी याबाबत एक निवेदन जारी करत सांगितले की, एका शेतकऱ्याला त्याच्या जर्जर कपड्यांमुळे नम्मा मेट्रोमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर बीएमआरसीएलने कारवाई करत सुरक्षा पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाकले आहे. बीएमआरसीएलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने पुढे सांगितले की, नम्मा मेट्रो ही सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड दिलगीर आहे.’