कोरोना महामारीच्या (Covid-19) काळात भारताने लसीकरणावर (Vaccination) खूप भर दिला. वेळोवेळी जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी म्हणून सरकार प्रयत्नशील राहिले. परंतु हे लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेक बनावट लस प्रमाणपत्रे (Fake Covid-19 Vaccine Certificate) तयार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. गुजरातमधील (Gujarat) जुनागडमधून लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीची बातमी समोर आली आहे.
येथे काही सेलिब्रिटींच्या नावाने कोरोना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहेत. जया बच्चन, जुही चावला यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या नावाची प्रमाणपत्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही प्रमाणपत्रे व्हायरल झाल्यानंतर जुनागडचे जिल्हाधिकारी रचित राज यांनी त्याची दखल घेत बनावट कोविड लस प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाने घडल्या प्रकाराच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय तपास पथक तयार केले आहे. या सर्व प्रमाणपत्रांवर पंतप्रधान मोदींचे छायाचित्रही छापण्यात आले आहे. या खुलाशामुळे कोरोना लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. लोक म्हणत आहे की, जया बच्चन, जुही चावला आणि मोहम्मद कैफ सारखे सेलेब्ज कोरोना लसीकरणासाठी जुनागडमध्ये आले होते का? 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Shocking! कोविडच्या भीतीमुळे महिलेने 10 वर्षांच्या मुलासह स्वतःला तीन वर्षे घेतले कोंडून; पतीलाही येऊ दिले नाही)
अहवालानुसार, बॉलीवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन, अभिनेत्री जुही चावला, महिमा चौधरी आणि क्रिकेटर मोहम्मद कैफ यांच्या नावाची प्रमाणपत्रे व्हायरल झाली आहेत. महत्वाचे म्हणजे सर्व प्रमाणपत्रांवर जन्मतारीख 1 जानेवारी अशी लिहिली आहे. जया बच्चन यांचे वय 23 वर्षे, महिमाचे वय 22 आणि जुही चावलाचे वय 44 वर्षे तर मोहम्मद कैफचे वय 57 दाखवले आहे. याबाबत जिल्हाधिकारी रचित राज म्हणाले की, माझ्या निदर्शनास आले आहे की, सेलिब्रिटींच्या नावाने कोविड लस प्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.