Fertilizer Scam: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या बंधूंशी संबंधित 13 मालमत्तांवर ईडीचा छापा
ED Raids Premises of Rajasthan CM Ashok Gehlot's Brother (Photo Credits: ANI)

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate)अर्थातच ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचे बंधू अग्रसेन यांच्या मालमत्ता असलेल्या अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. खत घोटाळा (Fertilizer Scam) प्रकरणासंदर्भात ही कारवाई सुरु आहे. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) झाल्याचा संशय असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यासाठी ईडी (ED) देशभरात छापेमारी करत आहे. अग्रसेन यांच्याशी संबधीत 13 ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे समजते.

अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, खत घोटाळा प्रकरणाशी संबंधीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी देशभरात छापे टाकण्यात येत आहेत. यात अशोक गहलोत यांच्या बंधूंशी संबंधीत ठिकाणांवरही छापा टाकण्यात आला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्ली येथील सुमारे 13 ठिकाणी चौकशी केली जात आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, जोधपूर येथे अग्रसेन गहलोत यांच्या ठिकाणांवरही चौकशी केली जाता आहे. या प्रकरणात या आधी 7 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

खत घोटाळा प्रकरणात कस्टम विभागाने (Customs Department) केलेल्या तक्रार आणि आरोपपत्राच्या आधारावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजस्थनमधील 6, गुजरातमधील 4, पश्चिम बंगालमधील 2 आणि दिल्ली येथील एका ठिकाणी पीएमएलए च्या माध्यमातून एजेन्सी द्वारे छापे टाकण्यात आले आहेत. (हेही वाचा, Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांना दिलासा, 24 जुलै पर्यंत कोणतीही कारवाई नाही; उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला)

दरम्यान, या आधी आयकर विभागाने राजस्थन येथील एका ज्वेलरी कंपनीच्या जयपूर आणि इतर चार शहरांमधील काही कार्यालयं आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. आयकर विभागाने ही कारवाई 13 जुलै या दिवशी केली होती. तेव्हा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, दिल्ली, जयपुर आणि मुंबई येथील आयकर विभागाने ओम कोठारी समूहावर छापे टाकले आहेत. सुनील कोठारी, डीपी कोठारी आणि विकास कोठारी एनएसई आणि बीएसई या कंपन्या रडारवर होत्या.