जम्मू काश्मीर: पुलवामा येथे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; मोबाईल सेवा ठप्प
भारतीय सेना (Photo Credit: PTI)

जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील त्राल (Tral) परिसरात सुरक्षारक्षक (security forces) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. एनआयएच्या वृत्तानुसार, दक्षिण काश्मीर पुलवामा जिल्ह्यातील हाफू (Hafoo) गावाला दहशतवाद्यांनी घेरले. त्यानंतर  दहशतवादी आणि सुरक्षारक्षक समोरासमोर आल्यानंतर दोन्ही दिशांनी गोळीबाराला सुरुवात झाली. गावात एकूण किती दहशतवादी लपून बसले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.

भारतीय सैन्याला गावात दहशतवादी घुसल्याची खबर मिळताच त्यांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केल्यानंतर परिस्थितीने अधिक गंभीर रुप धारण केले आणि सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. त्यानंतर त्राल गावातील मोबाईल सेवाही ठप्प करण्यात आली.

दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात होणाऱ्या चकमकीच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला. तर हिजबुल मुजाहिदिन आणि लष्कर-ए-तोयबाकेचे 6 दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात सेनेला यश आले. मात्र सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका स्थानिक नागरिकाला आपले प्राण गमवावे लागले.