Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातील अनेक कंपन्या नोकर कपात करत आहे. भारतामध्येही अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे. सध्या आर्थिक मंदीची भीती असताना एक नवीन नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पीडब्ल्यूसी इंडियाने (PWC India) पुढील 5 वर्षांत भारतातील 30,000 हून अधिक बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. पीडब्ल्यूसी इंडियाच्या या योजनेनुसार 2028 पर्यंत त्यांची कर्मचारी संख्या 80,000 पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.

पीडब्ल्यूसी इंडियाने  आणि पीडब्ल्यूसी युएस यांच्यात भारतात नवीन जागतिक केंद्रे स्थापन करण्यासाठी आणि कंपनीच्या वाढीला गती देऊन, सेवा गुणवत्ता सुधारण्यास मदत करण्यासाठी विद्यमान कर्मचारी संख्या वाढविण्याचा संयुक्त उपक्रम स्थापन केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कंपनीत सध्या तिच्या भारतीय अभ्यास आणि जागतिक वितरण केंद्रांदरम्यान भारतामध्ये 50,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.

पीडब्ल्यूसी युएसचे अध्यक्ष आणि वरिष्ठ भागीदार टीम रायन म्हणाले की, पीडब्ल्यूसी इंडियाने  आणि पीडब्ल्यूसी युएस यांच्यातील वाढीव सहकार्यामुळे जागतिक टॅलेंट फूटप्रिंटच्या वाढीला अधिक गती मिळेल आणि आमच्या ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करण्यात मदत होईल. तसेच यामुळे सर्व गुणवत्तेवर आधारित  सखोल तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यासाठी अधिक संधी निर्माण केल्या जातील.

पीडब्ल्यूसीचे चेअरपर्सन संजीव कृष्णन म्हणाले की, 2021 मध्ये लाँच केलेल्या नवीन समानीकरण जागतिक धोरणाचा एक भाग म्हणून, पीडब्ल्यूसी इंडियाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा, देशांतर्गत बाजारपेठेची क्षमता वापरण्याचा आणि समाजासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. (हेही वाचा: Indian Startups Raised: भारतीय स्टार्टअप्सनी जानेवारी 2023 मध्ये कमावले 1.2 अब्ज डॉलर्स; PhonePe आणि KreditBee आघाडीवर)

दरम्यान, मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पीडब्ल्यूसी इंडियाच्या सर्वेक्षणात समोर आले होते की, देशातील 34 टक्के कर्मचारी त्यांच्या नोकऱ्या बदलण्याचा विचार करत आहेत. तर जागतिक स्तरावर असे करण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांची संख्या 19 टक्के आहे. भारतातील एक मोठा व्यावसायिक गट त्यांच्या सध्याच्या नोकरीवर नाराज आहे आणि त्यांना बदल हवा आहे असे सर्वेक्षणात दिसून आले होते.