Union Budget 2020: शुक्रवारी, 31 जानेवारी रोजी केंद्र सरकार 2019-20 (Economic Survey 2020) या वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण जाहीर करणार आहे. इकॉनॉमिक सर्वे म्हणजेच अर्थव्यवस्थेविषयी सर्वसमावेशक अहवाल. हा सर्वे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार तयार करतात. 31 जानेवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या 2019-20 चे आर्थिक सर्वेक्षण संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडतील. त्यानंतर नवी दिल्ली येथे दुपारी 1.45 वाजता मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती व्ही. सुब्रमण्यम आणि त्यांच्या टीमद्वारे पत्रकार परिषद घेण्यात येईल. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण जाहीर केला जातो.
आर्थिक सर्वेक्षण 2020 चं Live Streaming कुठे पाहता येईल?
आर्थिक सर्वेक्षण 2019-20 चे थेट प्रक्षेपण आपण लोकसभा टीव्हीवर पाहू शकता. तसेच PIB च्या अधिकृत वेबसाईटवरही आपण हे आर्थिक सर्वेक्षण पाहू शकता.
दरम्यान, आर्थिक सर्वेक्षणात मागील आर्थिक वर्षातील अर्थव्यवस्थेतील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात येतो. तसेच या सर्वेक्षणात सरकारचे धोरणात्मक उपक्रम आणि अल्प व मध्यम मुदतींमधील आर्थिक संभावनांवर प्रकाश टाकला जातो. (हेही वाचा, Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?)
आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करते?
वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार डिपार्टमेंटमधील इकॉनॉमिक विभाग मुख्य आर्थिक सल्लागारांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आर्थिक सर्वेक्षण तयार करतो. वित्त सचिवांकडून याची तपासणी केली जाते आणि संसदेत मांडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी मान्यता घेतली जाते. तर आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आल्यावर, दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. यावर्षी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे.