
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री निहारिका कोनिडेलाला (Niharika Konidela) नुकतेच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. निहारिका ही तेलुगु चित्रपट अभिनेत्री असून ती तेलुगु बिग बॉस सीझन 3 ची विजेतीदेखील आहे. ड्रग्ज प्रकरणात (Drug Case) निहारिकाला ताब्यात घेतले होते. टास्क फोर्सने शनिवारी (2 एप्रिल) रात्री उशिरा एका पंचतारांकित हॉटेलच्या पबवर छापा टाकला, जिथे सुमारे 150 लोक पार्टी करत होते. अभिनेत्री निहारिकाशिवाय गायक राहुल सिपलीगुंजचाही (Rahul Sipligunj) या पार्टीत समावेश होता. यातील अनेकांवर रात्री उशिरा पार्टी करत ड्रग्ज वाटल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहारिकाला रविवारी पहाटे 3 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ताब्यात घेण्यात आल्याची पुष्टी झाली आहे, मात्र सध्या तिची मुक्तता करण्यात आली आहे. बंजारा हिल्स पोलीस स्टेशनच्या एका पोलिसाने हैदराबाद टाईम्सला सांगितले, ‘काल रात्री सुमारे 150 लोक एका पबमध्ये पार्टी करत होते. मध्यरात्रीनंतर पब चालवण्यास परवानगी नाही. आवारात प्रतिबंधित पदार्थ सापडल्याने या लोकांना ताब्यात घेण्यात आहे. त्यामध्ये एक गायक आणि एका अभिनेत्रीचाही समावेश आहे. आम्ही चौकशी करत आहोत आणि अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. अधिक तपशील लवकरच समोर येतील.’
राहुल आणि निहारिका हे दोघेही इतर अनेक व्हीआयपींसह रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये होते. त्यांना पोलिसांकडून नोटीस मिळाली. या दोघांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही याची अजूनतरी पुष्टी झाली नाही. रिपोर्टनुसार, रविवारी सकाळी 8 वाजता राहुलला पोलिसांनी सोडले, तर निहारिका दुपारी 12 वाजता स्टेशनमधून बाहेर पडताना दिसली. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. (हेही वाचा: Telangana: ICU मध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या हाताला उंदराने घेतला चावा; 2 डॉक्टर निलंबित)
माहितीनुसार, बंजारा हिल्समधील या मोठ्या अंमली पदार्थांच्या बस्टमध्ये राजकारणी आणि आंध्र प्रदेशातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यासह अनेक व्हिआयपी लोकांचा समावेश आहे. पोलिसांनी रात्री अडीच वाजता छापा टाकून लाखो रुपयांची पावडर जप्त केली. सुरुवातीला या लोकांनी जप्त केलेली पावडर साखर असल्याचा दावा केला होता, परंतु नंतर ते कोकेन असल्याचे आढळले. या 150 लोकांमधील चार परदेशी नागरिकांना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.