Double-Decker Coach (Photo Credit : Twitter)

गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांना अनेक सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता भारतीय रेल्वे त्यांच्या प्रवाशांना वेगाने धावणाऱ्या आणि अनेक सुविधा असलेल्या डबल डेकर कोचमधून (Double-Decker Coach) प्रवास करण्याची संधी देत आहे. रेल्वे कोच फॅक्टरी कपूरथला (RCF kapurthala) ने 160 किमी प्रतितास वेगाने चालणार्‍या डबल डेकर कोचची रचना केली आहे. काही खास प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन हा कोच तयार करण्यात आला आहे. यामध्ये जुन्या कोचपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहेत. या अपग्रेड केलेल्या कोचमध्ये अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली असून, या ट्रेनचा व्हिडिओही शेअर केला आहे. डबल डेकर कोचमध्ये प्रवाशांना बर्‍याच आधुनिक सुविधांचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. कोचची रचना अशा प्रकारे डिझाइन केली गेली आहे की, प्रत्येक कोचमध्ये 120 प्रवासी प्रवास करू शकतील. कोचच्या अप्पर डेकमध्ये 50 आणि लोअर डेकमध्ये 48 प्रवासी बसू शकतील. त्याच वेळी कोचच्या मागील बाजूच्या मधल्या डेकच्या एका बाजूला 16 आणि दुसऱ्या बाजूला 6 जागांची व्यवस्था करण्यात आली आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार हा नवीन डबल डेकर कोच आधुनिक डिझाइनसह तयार करण्यात आला आहे. तसेच, या कोचमध्ये विमानांच्या सीटवर उपलब्ध असलेल्या काही सोयीसुविधा आहेत. यात सीट्सची व्यवस्था अशा प्रकारे केली गेली आहे की, प्रवाशांना भरपूर लेग स्पेस मिळेल. यासह, त्यांना आपल्या सीटवर मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंगची सुविधा देखील मिळणार आहे. याशिवाय या कोचमध्ये जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि एलईडी डेस्टिनेशन बोर्डदेखील बसविण्यात आले आहेत. प्रवाशांना गरम अन्न आणि पेय पदार्थ देण्यासाठी प्रत्येक कोचमध्ये मिनी पँट्रीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. (हेही वाचा: मोदी सरकारची मेक इन इंडिया योजना ठरली अपयशी? भारताच्या GDP मध्ये उत्पादन क्षेत्रातील वाटा 20 वर्षांत सर्वात कमी)

आता ही डबल डेकर ट्रेन भारताच्या सर्व महत्वाच्या मार्गांवर कार्यरत असणार आहे. दरम्यान, आरसीएफ देशातील एकमेव उत्पादन युनिट आहे ज्याने भारतीय रेल्वेसाठी डबल डेकर कोच तयार केले आहेत. रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागात दोन डबल डेकर गाड्या चालवल्या जात आहेत. एक ट्रेन मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान आहे आणि दुसरी ट्रेन पोरबंदर ते दिल्ली सराय रोहिल्ला रेल्वे स्थानक यांच्यादरम्यान आहे.