Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सध्या देशात कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. अशात सरकार लॉक डाऊनमुळे (Lockdown) प्रतिबंधित असलेल्या अनेक गोष्टी सुरु करत आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे विमान सेवा (Airlines). आता सरकारने विमानांच्या उड्डाणाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Civil Aviation Ministry) म्हटले आहे की, भारतीय विमान कंपन्या सध्याच्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे पुढील वर्षी 24 फेब्रुवारीपर्यंत, त्यांच्या कोरोना आधीच्या उड्डाण क्षमतेच्या 60 टक्के देशांतर्गत उड्डाणे (Domestic Passenger Flights) चालवू शकतील. मंत्रालयाने 2 सप्टेंबरला अधिकृत आदेशाद्वारे 60 टक्के मर्यादेबाबत विमान कंपन्यांना माहिती दिली होती, परंतु या उड्डाणांच्या कालावधीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

29 ऑक्टोबर रोजी मंत्रालयाने एक नवीन आदेश जारी केला होता, ज्यामध्ये असे स्पष्ट केले गेले की 2 सप्टेंबर 2020 रोजी काढण्यात आलेला आदेश 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत लागू राहील. 26 जून रोजी मंत्रालयाने विमान कंपन्यांना त्यांच्या कोरोना आधीच्या क्षणातेच्या जास्तीत जास्त 45 टक्के देशांतर्गत उड्डाणे चालविण्यास परवानगी दिली होती. कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांच्या अंतरानंतर मंत्रालयाने 25 मेपासून स्थानिक प्रवासी सेवा पुन्हा सुरू केल्या. मात्र, एअरलाईन्सला त्यांच्या पूर्व-कोव्हिड देशांतर्गत उड्डाणांपैकी 33 टक्क्यांहून अधिक उड्डाणे चालवण्याची परवानगी नव्हती. (हेही वाचा: पंजाबमध्ये 32 ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे सेवा बंद; Railway Ministry ला तब्बल 1,200 कोटींचे नुकसान)

26 जूनच्या आदेशात बदल करुन त्यामध्ये देशांतर्गत उड्डाणांच्या संख्येवर 45 टक्के मर्यादा ठेवण्यात आली होती. मंत्रालयाने 2 सप्टेंबरला एक आदेश जारी केला होता. मात्र वंदे भारत मिशन अंतर्गत मे पासून विशेष आणि जुलैपासून विविध देशांशी करार झाल्याप्रमाणे विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने आज मोठा निर्णय घेत, राज्यात उद्यापासून सिनेमा हॉल, थिएटर, मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी दिली आहे.