Flights | (Photo Credit - X/ANI)

Domestic Airfares Surge: देशात सुट्ट्यांचा हंगाम (Holiday Season) सुरु झाला आहे. या काळात अनेक लोक विविध ठिकाणी प्रवास करण्याचे नियोजन करत आहेत. अशात देशांतर्गत विमानसेवा क्षेत्राने प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात विमान भाडेवाढीचा भार टाकला आहे. म्हणजेच सध्याच्या सुट्ट्यांच्या काळात देशांतर्गत विमानप्रवास महागला आहे. मुंबईतून इतर शहरांसाठी उड्डाण घेणाऱ्या विमानांच्या दरांमध्ये अविश्वसनीय वाढ दिसून आली आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर भाडे 1258% पर्यंत पोहोचले आहे, त्यानंतर दाबोलिम, बेंगळुरू, कोलकाता आणि इतर शहरे आहेत.

बुधवारी द फ्री प्रेस जर्नलने मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडे विमानभाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या तक्रारीबद्दल वृत्त दिले. एमजीपीने मुंबई, दिल्ली आणि लखनौ दरम्यान उडणाऱ्या इंडिगो, एअर इंडिया, आकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानांविरोधात तक्रार केली होती. या कंपन्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 6,000 ते 13,000 रुपयांपर्यंतच्या तुलनेत, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भाडे 12,100 ते 27,800 रुपयांपर्यंत वाढवले ​​होते.

फ्री प्रेस जर्नलनुसार, मुंबईहून निघणाऱ्या फ्लाइट्सनी सुट्टीच्या काळात त्यांच्या भाड्यात सामान्य दरांच्या तुलनेत लक्षणीय वाढ केली आहे. अहमदाबादला जाणाऱ्या अकासा एअरच्या फ्लाइटमध्ये सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती, जी 1258% आहे. त्याचप्रमाणे, एअर इंडियाच्या गोव्याच्या दाबोलीमच्या फ्लाइटमध्ये त्याच्या सामान्य भाड्याच्या तुलनेत 766% वाढ झाली आहे, एअर इंडियाच्या बेंगळुरूसाठी विमान भाडे 625% वाढले आहे, एअर इंडियाच्या कोलकाता फ्लाइटमध्ये 491% वाढ झाली आहे, इंडिगोच्या चेन्नईच्या फ्लाइटमध्ये 355% वाढ झाली आहे, जयपूरसाठी 345%, भुवनेश्वरसाठी इंडिगो 145% तर अमृतसरसाठी एअर इंडिया सामान्य विमान भाड्याच्या तुलनेत 133% वाढ झाली.

दुसरीकडे, एअरलाइन्स कंपन्यांची मक्तेदारी असलेल्या मार्गांवरही एअर इंडियाच्या भुजला जाणाऱ्या फ्लाइटच्या 310% आणि इंडिगोच्या आग्राला जाणाऱ्या फ्लाइटच्या 72.86% दराने विमानभाड्यात मोठी वाढ झाली. विमान भाड्यात ही वाढ सुट्टीच्या हंगामापूर्वी करण्यात आली आहे. यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर जाणाऱ्या लोकांच्या खिशाला फटका बसू शकतो. (हेही वाचा : Railway Accidents: गेल्या 8 महिन्यांत देशात 29 रेल्वे अपघात; 17 जणांचा मृत्यू, 71 जण जखमी, कारणांमध्ये उपकरणे बिघाड, तोडफोड यांचा समावेश)

याबाबत मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे म्हणाले, ‘आम्ही नागरी विमान वाहतूक आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयांकडे विमान भाड्यात प्रचंड वाढ झाल्याची तक्रार केली आहे. ही आकडेवारी आणखी धक्कादायक आहे. आम्ही या समस्येत तात्काळ सरकारच्या हस्तक्षेपाची अपेक्षा करत आहोत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाला अनुचित व्यापार पद्धतीच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे आणि ते रोखण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार आहेत.’