Dilip Chhabria Arrested: फसवणुकीच्या तिसऱ्या प्रकारात कार डिझायनर दिलीप छाब्रियाला अटक; 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
Dilip Chhabria (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) फसवणुकीच्या तिसऱ्या प्रकरणात कार डिझायनर दिलीप छाब्रियाला (Dilip Chhabria) अटक केली आहे. त्याने चेन्नईतील एका व्यावसायिकाची 22 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोप आहे. या प्रकरणात छाब्रियाच्या कुटुंबातील सदस्यांच्यावरही आरोप लावण्यात आला आहे. स्थानिक कोर्टाने 5 फेब्रुवारीपर्यंत छाब्रियाला पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई क्राइम ब्रांचने डिसेंबर 2020 मध्ये कार फायनान्स रॅकेटच्या आरोपात छाब्रिया याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे. आता ऑटोमोबाईल स्पेयर पार्ट्स पुरवठादार इंद्रमल रमाणी यांनी दिलेल्या तक्रारीवर त्याच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाणी यांनी आरोप केला आहे की, त्यांनी छाब्रियाला सुटे भाग पुरवले पण छाब्रियाने त्यांचे 18 कोटी दिले नाहीत. छाब्रियाने रमाणीकडून व्यवसायात गुंतवणूकीचे आमिष दाखवून कर्ज म्हणून काही रक्कमही घेतली होती. व्याजासह, कर्जाची रक्कम आता 4.12 कोटीवर गेली आहे, ज्याबाबत तक्रार केली गेली आहे. या तक्रारीवरुन कारवाई करत पोलिसांनी छाब्रिया, त्याची पत्नी चेरी, मुलगा बोनिटो, त्यांची सून अनुश्री आणि बहीण कांचन यांच्यावर विश्वासघात आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कारला फ्यूचरिस्टिक मेकओव्हर देणारे म्हणून ओळखले जाणारे छाब्रिया यांना कार फायनान्सिंग आणि ड्युअल रजिस्ट्रेशन रॅकेट प्रकरणी, 29 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी बुद्धिमत्ता विभागाने (CIU) अटक केली होती. (हेही वाचा: DC Avanti Scam: डीसी अवंती घोटाळयाप्रकरणी कार डिझायनर दिलीप छाब्रियाची बहिण कांचनला अटक)

नंतर कॉमेडीयन कपिल शर्मा याने वर्सोवा पोलिसात तक्रार दाखल केली होती की, छाब्रियाने व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करण्यासाठी त्याच्याकडून 5.7 कोटी घेतले होते परंतु ते दिले नाहीत. शर्मा याने 7 जानेवारीला सीआययूकडे संपर्क साधला होता. आपल्या निवेदनात त्याने म्हटले आहे की, त्याने 2017 मध्ये छाब्रियाला व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करण्यास सांगितले होते आणि मे 2017 ते 2018 दरम्यान 5.3 कोटी दिले. जुलै 2018 मध्ये, छाब्रियाने जीएसटी म्हणून 40 लाख अधिक मागितले होते. कपिलने छाब्रियाला सर्व पैसे दिले मात्र छाब्रियाने व्हॅन दिली नाही.