Dilip Chhabria (Photo Credits: Twitter)

मुंबई पोलिसांनी डीसी अवंती कार फायनान्सिंग आणि फसवणूक (DC Avanti Scam) प्रकरणात प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाची (Car Designer Dilip Chhabria) बहीण, कांचन यांना अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. गुन्हे शाखेच्या क्राइम इंटेलिजन्स युनिट (CIU) च्या पथकाने दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हमधील एका रेस्टॉरंटमधून कांचनला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक सचिव वाजे हे पोलिस पथकाचे नेतृत्व करीत होते. या प्रकरणात कांचनची कथित भूमिका उघडकीस आल्यानंतर ही कारवाई केली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सीआययूने गेल्या महिन्यात डीसी अवंती कार फायनान्सिंग टोळीचा पर्दाफाश केला होता आणि 28 डिसेंबर 2020 रोजी छाब्रियाला अटक केली होती.

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया एकाच नंबरची नोंदणी व चेसिस नंबर असलेली अनेक वाहने बनवित होता. एवढेच नव्हे अनेक NBFC बँकांकडून तो ग्राहक म्हणून स्वत: च्या गाड्याही खरेदी करीत होता. त्यानंतर या गाड्या थर्ड पार्टीला विकल्या जात असे. आतापर्यंत अशा 127 वाहनांची विक्री झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. दिलीप छाब्रियाविरोधात भादंवि कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी कपिल शर्माने दिलीप छाब्रियाविरूद्ध फसवणूकीचा आरोप दाखल केला होता. (हेही वाचा: Kapil Sharma Called for Inquiry: कॉमेडीयन कपिल शर्माला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठवले समन्स; कार डिझायनर दिलीप छाब्रिया प्रकरणात नोंदवणार स्टेटमेंट)

गाड्यांच्या दुहेरी नोंदणी रॅकेटमध्ये दिलीप छाब्रियाला अटक केल्यानंतर आणि कॉमेडियन कपिल शर्माने फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चेन्नईच्या एका व्यावसायिकाची 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल छाब्रिया व डीसी कंपनीच्या इतर संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या छाब्रिया न्यायालयीन कोठडीत आहे.