Kapil Sharma Called for Inquiry: कॉमेडीयन कपिल शर्माला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाठवले समन्स; कार डिझायनर दिलीप छाब्रिया प्रकरणात नोंदवणार स्टेटमेंट
Kapil Sharma | Photo Credits: Instagram

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी बनावट नोंदणीकृत मोटारी जप्त केल्याची माहिती मिळाली होती. आता याच प्रकरणात विनोदी कलाकार कपिल शर्मा (Kapil Sharma) ला आज क्रिमिनल इंटेलिजंस यूनिटचे एपीआय सचिन वझे यांनी चौकशीसाठी बोलावले आहे. कपिल लवकरच एपीआय कार्यालयात चौकशीसाठी दाखल होईल. पोलिसांनी सांगितले की कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांच्याविरूद्ध फसवणूकीचा आरोप दाखल केला होता. आता कपिलला साक्षीदार म्हणून त्याचे निवेदन नोंदवण्यासाठी बोलविण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये बनावट कागदपत्रांच्या नावाने रजिस्टर केलेल्या अनेक गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. कपिलने दिलीपवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आता एका साक्षीदाराच्या रूपाने कपिलला त्याचे निवेदन नोंदवण्यासाठी बोलविण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

याआधी मुंबई पोलिसांनी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार डिझायनर आणि कार मॉडिफिकेशन स्टुडिओ 'डीसी डिझाईन' चे संस्थापक दिलीप छाब्रिया  यांना अटक केली होती. त्यांच्यावर मल्टीपल कार रजिस्ट्रेशन रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. दिलीप छाब्रियाविरोधात भादंवि कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण)

दरम्यान, दिलीप यांनीच भारताची पहिली स्पोर्ट्स कार डिझाईन केली होती. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेक कलाकारांसाठी त्यांनी गाड्या डिझाइन केल्या आहेत. कारबरोबर ते सेलिब्रिटींच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनदेखील डिझाइन करतात. कपिलकडेही दिलीपने डिझाइन केलेली व्हॅनिटी व्हॅन आहे. दुसरीकडे कपिल शर्मा लवकरच आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. कॉमेडियन कपिल शर्माने सोमवारी एका ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली होती. कपिल शर्मा लवकरच नेटफ्लिक्सवर दिसणार आहे.