मुंबई प्रमाणेच दिल्लीत सुद्धा 24x7 बाजारपेठा? आम आदमी पार्टी तयार करत आहे आपला जाहीरनामा
Delhi. (Photo credit: IANS)

Aam Aadmi Party's Manifesto: 8 फेब्रुवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर आम आदमी पार्टीने (आप) विजय मिळवला तर दिल्लीतही '24x7 बाजारपेठा सुरु' हे मुंबईचे मॉडेल पाहायला मिळू शकतं. तसेच दंतचिकित्सा, त्वचाविज्ञान आणि मानसिक आरोग्य सुविधा, प्रीमियम बस सेवा, बेघर लोकांसाठी निवारा आणि अनेक लहान क्रीडा संकुले या विविध सुविधांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश होण्याची शक्यता आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीकरांना नाईट लाईफ जगता यावी तसेच व्यवसाय वाढण्यास मदत करण्यासाठी आप पक्ष 24x7 बाजारपेठ सुरु ठेवण्याच्या पर्यायांचा शोध घेत आहेत. या उपक्रमाचा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास हा संपूर्ण दिल्लीभर वाढविला जाईल.

जगातील इतर मोठ्या शहरांप्रमाणेच आपल्या देशाची राजधानीचे रूपांतरण करण्याची कल्पना आहे, अशी माहिती टीओआय ने दिली आहे. 24 तास बाजार सुरू करण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. प्रकल्पातील सर्व बाबींचा विचार केला जाईल आणि प्रकल्प सुरू करण्यापूर्वी प्रत्येक भागधारकांना विश्वासात घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

सरकारने यापूर्वीच दिल्लीत 1.4 लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आणि हे शहर प्रत्येकासाठी, विशेषकरुन महिलांसाठी सुरक्षित करण्यासाठी आणखी 1.4 लाख लावले गेले आहेत. राजधानीला अंधारापासून मुक्त करण्यासाठी अडीच लाख पथदिवे बसविण्यासही सरकारने सुरुवात केली आहे.

जाहीरनाम्यात रस्त्यांवरील वाहतुकीचे ओझे कमी करण्यासाठी प्रीमियम बस सेवेचीही नमूद केली जाण्याची शक्यता आहे. प्रीमियम बसेस अधिक चांगल्या सुविधांच्या शोधात असलेल्या व्हाईट कॉलर प्रवाशांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतील. या राईड्स केवळ आरामदायक आणि आनंददायीच नसतील तर वाहतुकीची कोंडी कमी करण्यास तसेच वायू प्रदूषणाला आळा घालण्यासही मदत करतील.

मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू

दरम्यान, कालकाजी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आप सरकारच्या शिक्षण धोरणांमागील मुख्य व्यक्ती अतिशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती रविवारी जाहीर होणार्‍या जाहीरनाम्यास अंतिम रूप देत आहे.