Live In Relationship: राजधानी दिल्ली (Delhi Shocker) येथे एका महिलेची हत्या झाल्याची माहिती पुढे येत आहे. ही घटना शहारच्या नैऋत्येस असलेल्या अयोध्या परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे महिलेची हत्या तिच्या लिव्ह इन पार्टनरने (Live in Partner) केल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक म्हणजे लिव्ह इन रिलशनमध्ये जोडीदारासोबत राहात असलेल्या घरातील एका कपाटात तिचा मृतदेह आढळून आला. वयवर्षे 26 असलेली ही महिला पाठिमागील काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनीही अनेकदा प्रयत्न करुनही तिच्याशी संपर्क न झाल्याने पोलिसांध्ये तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सदर महिला हरविल्याचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.
पीडितेच्या वडिलांकडून पोलिसांत तक्रार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेशी संपर्क न होऊ शकल्याने तिच्या वडिलांनी पोलीस तक्रार दिली होती. त्यानुसार हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस सदर महिलेचा शोध घेत होते. दरम्यान, बुधवारी (3 एप्रिल) रात्री 10.40 वाजता पोलिसांना एक फोन आला. फोनवरील व्यक्तीने सांगितले की, बेपत्ता मुलीची हत्या होऊ शकते. पोलिसांनी फोनची दखल तातडीने घेत संभाव्य ठिकाणी एक पथक पाठवले. पोलिसांनी घेतलेल्या झडतमीध्ये घरातील एका कपाटात मुलीचा मृतदेह आढळून आला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
दीड महिन्यांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये
महिलेच्या वडिलांनी सांगितले की, पीडित महिला विपल टेलर नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहात होती. हा व्यक्ती मुळचा गुजरातमधील सूरत येथील होता. सदर महिला पाठिमागील जवळपास दीड महिन्यांपासून त्याच्यासोबत भाड्याच्या घरात लिव्ह इनमध्ये राहात होती. वडिलांनी सांगितले की, आपल्या मुलीने आपल्याला जेव्हा शेवटचा संपर्क केला होता तेव्हा तिने सांगितले होते की, आपला जोडीदार आपल्याला मारहाण करतो. इतकेच नव्हे तर तो आपली हत्याही करु शकतो, अशी भीतीही तिने व्यक्त केल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले.
महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी लिव्ह इन पार्टनरविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विपूल टेलर सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहे.
लिव्ह-इन-रिलेशनशिप म्हणज काय?
परस्परांशी कायदेशीर अथवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त पद्धतीने विवाह झाला नसताना देखील एखादी स्त्री-पुरुष विवाहीत जोडप्याप्रमाणे एकत्र राहतात त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात. याला सहवास म्हणूनही ओळखले जाते. हे संबंध बहुधा दीर्घकालीन असतात. ज्यामध्ये भावनिक किंवा लैंगिक संबंधांचा समावेश असतो. हा शब्द बहुधा विवाहित नसलेल्या जोडप्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.