Bananas, Heroin | (Photo Credit: Archived, edited, representative images)

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) येथे दिल्ली (Delhi) पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीतील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सातही जण अफगाणिस्तान (Afghanistan) येथून अंमली पदार्थ घेऊन भारतात येत होते. या सात जणांकडे हेरॉइन (Heroin) पदार्थाच्या तब्बल 177 कॅप्सूल होत्या. ज्या त्यांनी पोटात लपवल्या होत्या. पोटात लपवलेल्या या कॅप्सूल बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आरोपींना तब्बल 10 डजन केळी (Bananas) खाण्यास दिली. केळ्याचा वापर केल्यामुळे या कॅप्सूल पोटाबाहेर येण्यास मदत झाली.

प्राप्त माहितीनुसार, रहमतुल्लाह, फैज, हबीबुल्लाह, वदूद, अब्दुल हमीद, फज अहमद आणि नुरजई कबरी अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींकडे मोठ्या प्रमाणात हेरॉइन होते. पोलिसांकडील माहितीनुसार, रहमतुल्लाह याच्या पोटात 28 फैज 38, हबीबुल्लाह आणि वदूद यांच्या पोटात 58, अब्दुल हमीद याच्या 18, फजल अहमद याच्या 37 आणि नरजई कबरी याच्या पोटात तब्बल 26 कॅप्सूल आढळून आल्या. एका विशिष्ट प्रकारच्या तेलाचा वापर करत आरोपींनी या गोळ्या पोटात ढकलल्या. या गोळ्या बाहेर येऊ नयेत यासाठी आरोपींनी प्रवासातील संपूर्ण काळात काहीच खाल्ले नाही. दिल्लीला आल्यावर एका हॉटेलमध्ये जाऊन पोटातील गोळ्या बाहेर काढण्याचा आरोपींचा विचार होता. तत्पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेत आरोपींचे मनसुबे उधळून लावले.

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पाळत ठेऊन अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. आरोपी विमानतळावर दाखल झाल्याची खात्री होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. मात्र, आरोपींकडे काहीच सापडले नाही. तरीही आरोपींवर पोलिसांचा संशय कायम होता. त्यामुळे पोलिसांनी आरोपींचे स्कॅनिंग केले तसेच एक्स-रे काढले. स्कॅनिंग आणि एक्सरेचा अहवाल प्राप्त होताच त्यात आरोपींचे पोटात काहीतरी कॅप्सूलसदृष्य वस्तू असल्याचे आढळून आले. (हेही वाचा, अबब! अमेरिकेत एक केळ विकले 85 लाखाला; फोटो होतोय व्हायरल)

कॅप्सूलसदृष्य वस्तू आरोपींच्या पोटात आढळल्याने पोलीसांची उत्सुकता अधिकच वाढली. त्यांनी आरोपींना तब्बल 10 डझन केळी खायला दिली. केळ्यांनी आपले काम केले आरोपींच्या पोटातील ती कॅप्सलसदृष्य वस्तू बाहेर आली. या कॅप्सूलची तपासणी करताच पोलिसांना धक्का बसला. या सर्व कॅप्सूल हेरॉइन या अंमली पदार्थाच्या होत्या. दरम्यान, या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघे भारतात राहणारे आहेत. हे दोघे हे हेरॉइन घेणार होते, अशी माहिती पुढे येत आहे.