Brij Bhushan Sharan Singh | (File Image)

कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) तब्बल 1,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात बृजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचार, पाटलाग आणि विनयभंग आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपांचा समावेश आहे. बृजभूषण यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यांच्या पुष्टीसाठी आतापर्यंत 25 जणांनी साक्ष दिल्याची यादी आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354A आणि 354D अन्वये बृजभूषण यांच्यावर आरोपपक्ष ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पोक्सो कायद्यांतर्गत मात्र, बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. त्या कायद्यात मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे.

बृजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करताना लावण्यात आलेले कलम 354 हे महिलेच्या विनयभंगशी संंबंधीत आहे. ज्यामध्ये आरोपीला एक वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. कलम 354A लैंगिक छळाशी संबंधित आहे. यामध्ये जामीनपात्र गुन्ह्याचा समावेश आहे आणि आरोपी दोषी आढळला तर त्याला दंड आणि तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम 354D हा धमकावणे किंवा जबरदस्तीशी संबंधित आहे. यात जामीनपात्र गुन्हा अंतर्भूत आहे. ज्यात तीन वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. उत्तर प्रदेशमधून भाजपचे सहा वेळा खासदार राहिलेल्या विरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांची पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर एका महिन्यानंतर हे आरोपपत्र आले आहे. (हेही वाचा, Wrestlers Protest: साक्षी मलिकचं मोठं वक्तव्य - जोपर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आशियाई स्पर्धेत सहभागी होणार नाही)

बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिकसह देशातील अव्वल कुस्तीपटू बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे ते नेतृत्वही करत आहेत. कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर आंदोलन सुरू केल्यानंतर 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी भाजपच्या या हेवीवेटवर नेत्यावर दोन गुन्हे दाखल केले. सहा पैलवानांच्या तक्रारीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्याची लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे कडक संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत नोंद करण्यात आली आहे. मात्र, क्लोजर रिपोर्ट सादर करताना पोलिसांनी POCSO मध्ये बृजभूषण यांना दिलासा दिला आहे.

ट्विट

दिल्ली पोलीस दलातील प्रत्येकी दहा कर्मचारी असलेली सहा असे मीळून 60 अधिकारी या प्रकरणाची चौकशी आणि तपास करत होते. ज्यामुळे भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्षही पाहाला मिळाला. बृजभूषण हे भाजपचे हेवीवेट नेते असल्यामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असून अभय दिले जात असल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला होता. मात्र, सत्ताधारी पक्षाने कायदा आपल्या मार्गावर चालत असल्याचे सांगण्यावर जोर दिला आहे. या हायव्होल्टेज घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेल्या सिंग यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत आणि त्यांना बदनाम करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे.