दिल्ली: 5 हजार कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या हेरॉईनची रिकाम्या असलेल्या पोत्यांमधून तस्करी, पोलीस चक्रावले
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - फेसबुक)

दिल्लीत (Delhi) हेरॉईनची (Heroin) तस्करी चक्क रिकाम्या पोत्यांमधून करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतु पोते रिकामे असताना सुद्धा कशा हातचालाखीपणे त्याधून हेरॉईन या अंमली पदार्थाची तस्करी केली गेली यामुळे पोलिससुद्धा चक्रावले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हेरॉईनची तस्करी परदेशातून भारतात करण्यात आली होती.

अवैध पद्धतीने सुरु असणाऱ्या अंमली पदार्थांच्या फॅक्टरीवर पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी फॅक्टरमध्ये फक्त रिकामी पोती दिसून आल्या. परंतु पोलिसांना या पोत्यांबद्दल अधिक माहिती मिळवली असता तागाच्या या रिकाम्या पोत्यांमधून एका विशिष्ट पद्धतीने हेरॉईन लपवले गेले आहे असे स्पष्ट झाले. तर हेरॉईन लपवण्यासाठी पोत पातळ हेरॉईनमध्ये बुडवले जात. त्यानंतर ही पोती सुकवून दिल्लीसाठी रवाना केली जात होती. तर दिल्लीला या पोत्या आल्यानंतर त्या एका विशिष्ट पद्धतीच्या रसायनांमध्ये बुडवून त्यामधून हेरॉईन काढले जायचे. हेरॉईन काढल्यानंतर त्या पोत्या जाळून टाकण्यात येत होत्या अशी धक्कादायक माहिती समोर आली.

(बंगळूरु येथे चिकनच्या नावाखाली कुत्र्याचे मांस विक्री? पोलिसांकडून तपास सुरु)

तसेच अफगाणिस्तान मधून या रिकाम्या पोत्या दिल्लीकडे पाठविल्या जात होत्या. तर जप्त केलेल्या पोत्यांमधील हेरॉईनची किंमत तब्बल 5 हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा गुप्तपणे अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.