Coronavirus (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने दिवसागणिक त्याच्या रुग्णांसह बळींचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे सरकराने तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचा निर्णय जाहीर केला असून 17 मे पर्यंत कायम राहणार आहे. याच दरम्यान आता सीआरपीएफच्या (CRPF) एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीतील (Delhi) सीआरपीएफचे मुख्यालय सील करण्यात आले आहे. त्याचसोबत सॅनियाटझेशन करण्यात येणार असून पुढील आदेशापर्यंत ही इमारत बंद ठेवण्यात येणार असून तेथे कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतात विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन मध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना काहीसा दिलासा देत तेथील काही गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र नियमांचे पालन करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. देशभरातील वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र काम करत आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस कर्मचारी सुद्धा अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे वांरवार सांगण्यात येत आहे.सीआरपीएच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता 40 अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.

(भारतातील कोणत्या राज्यांत किती आहेत COVID-19 रुग्ण; जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर)

दरम्यान, दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा 4122 वर पोहचला आहे. तर 64 जणांचा बळी गेला आहे. सध्या देशावरील कोरोनाचे महाभयंकर संकट ओढावले असून सरकारकडून त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तर दिल्ली येथे  एकाच इमारतीत राहणाऱ्या तब्बल 41 जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीतील कापसहेडा परिरातील ही इमारत असून ऐवढ्या मोठ्या संख्येने तेथे कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तसेच कोरोनाबाधितांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत ती इमारत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळच असल्याचे सांगण्यात आले आहे.